समुद्रकिनाऱ्यांवर उद्यापासून बोटिंग बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

दिवेआगर - हवामानातील संभाव्य बदल लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २५ मे नंतर विविध समुद्रकिनाऱ्यांवरील नौकानयन (बोटिंग) बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने दिले आहेत.  

दिवेआगर - हवामानातील संभाव्य बदल लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २५ मे नंतर विविध समुद्रकिनाऱ्यांवरील नौकानयन (बोटिंग) बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने दिले आहेत.  

श्रीवर्धन तालुक्‍यातील श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्‍वर या किनाऱ्यांवर नौकानयन, जलक्रीडेची सुविधा आहे. सध्या पॅराग्लायडिंग सेवा बंद आहे. मेरिटाईम बोर्डाच्या आदेशानुसार २६ मे पासून जलक्रीडा बंद करण्यात येणार आहे. या बोटींच्या मालकांना मेरिटाईम बोर्डाकडून डिसेंबर ते २५ मे अशी परवानगी देण्यात येते. २५ मे नंतर मॉन्सून दाखल होण्याच्या पूर्वी  खोल समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाटा उसळतात. त्याचा परिणाम किनाऱ्यावर होतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रकारचे नौकानयन, जलक्रीडा पूर्णपणे बंद करण्यात येतात. काही बोटींचे मालक २५ मे नंतरही बेकायदा या सेवा सुरू ठेवून पर्यटकांच्या जीवाशी खेळतात. त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सर्व प्रकारचे नौकानयन २५ मे नंतर थांबवण्याचे आदेश संबंधित परवानाधारकांना देण्यात आले आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या मदतीने कठोर कारवाई करण्यात येईल.
- रजनीकांत पेके, बंदर निरीक्षक, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड.