आंबोली: दारुच्या नशेत युवक पडले दरीत (व्हिडिओ)

अमोल टेंबकर
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सायंकाळी जोराचा पाऊस झाल्याने मृतदेह आणखी खाली वाहून गेल्याचे स्थानिक टीमचे अमरेश गावडे यांनी सांगितले. त्यामुळे मृतदेह उद्या काढण्यात येणार आहेत. घटनास्थळी गरदी व राठोड या दोघांचे वडील व नातेवाईक आले होते. 

आंबोली : जोरदार पावसामुळे येथील कावळेसाद पॉइंटजवळील दरीत कोसळलेल्या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह दुसऱ्या दिवशीही काढण्यात अपयश आले. त्यातील एक मृतदेह पाण्याच्या प्रवाहात नदीतून पुढे वाहून गेला आहे. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात आणखी अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. उद्या (ता. 3) पुन्हा ही मोहीम राबविण्यात येईल. दारुच्या नशेत हे युवक दरीत पडल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे.

येथे दोन दिवसांपूर्वी गडहिंग्लजमधील दोन पर्यटक "कावळेसाद'च्या दरीत कोसळले होते. त्यातील प्रताप राठोड (वय 21, मूळ रा. बीड, सध्या अत्याळ-गडहिंग्लज) यांचा मृतदेह शोधण्यात यश आले होते. इरफान गरदी (रा. हुंनगीहाळ, ता. गडहिंग्लज) यांचा शोध मात्र लागला नव्हता. आज पावसाचा जोर असल्याने दोन्ही मृतदेह आणखी खाली वाहून गेले. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशीही मृतदेह वर आणण्यात अपयश आले. 
कावळेसाद दरीत पडलेल्या इम्रान गारदी यांच्या मृतदेहापासून दहा मीटर अंतरावरच प्रताप राठोड यांचा मृतदेह प्रवाहातच दिसून आला. सांगेली येथील बाबल आल्मेडा, संतोष नार्वेकर आणि किरण नार्वेकर हे सकाळी दहाला कावळेसाद येथून उतरले; तर पाण्याचा प्रवाह जेथे दरीत पडतो तिथून कोल्हापूर येथील टीमचे विनायक कालेकर, अनिकेत कोदे हे उतरले होते. प्रवाहाजवळच इम्रान यांचा मृतदेह त्यांनी वर काढण्यासाठी बांधून ठेवला. त्या मृतदेहाच्या काही अंतरावरच प्रताप यांचा मृतदेह होता. त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त होता. त्यातच पावसाचा जोर जास्त असल्याने प्रताप यांचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहाने पुढे गेला. त्यामुळे आज दोन्ही मृतदेह वर काढणे शक्‍य झाले नाही. कोल्हापूरच्या टीममधील दोन जण सायंकाळी उशिरापर्यंत दरीतच होते. त्यांना पुन्हा दोरीवरून चढणे अशक्‍य झाले होते. त्यामुळे ते वर येण्यासाठी वाट शोधत होते. सांगेली टीम सायंकाळी पाचला वर आली. 

सायंकाळी जोराचा पाऊस झाल्याने मृतदेह आणखी खाली वाहून गेल्याचे स्थानिक टीमचे अमरेश गावडे यांनी सांगितले. त्यामुळे मृतदेह उद्या काढण्यात येणार आहेत. घटनास्थळी गरदी व राठोड या दोघांचे वडील व नातेवाईक आले होते.