बारसू, रावारीत आढळली 67 कातळशिल्पे

sculpture
sculpture

इजिप्तमधील रचनेशी साधर्म्य - प्राणी, पक्षी, सरीसर्पाचा समावेश, प्रथमच वेगळ्या रचना


रत्नागिरी- कातळखोद शिल्पांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या रचना रावारी व बारसू गावच्या सड्यावर आढळल्या आहेत. शोधमोहीमनंतर 67 ठिकाणी नवीन कातळशिल्पे सापडली. यातील एक मोठी रचना इजिप्तमधील रचनेशी मिळतीजुळती आहे. साऱ्या प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत. या राष्ट्रीय संपत्तीचे जतन गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने हा बहुमोल खजिना असून एकत्रित प्रयत्न झाल्यास अल्पावधीत कोकण आंतरराष्ट्रीय पर्यटनात अग्रेसर होईल.

रत्नागिरीतील अभ्यासक सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, केदार लेले, सौरभ लोगडे, सुशांत पेटकर यांनी लांजा तालुक्‍यातील रावारी सड्यावर ग्रामस्थ प्रसन्न दीक्षित, सरस्वती विद्यामंदिर, केंद्रीय शाळेचे शिक्षक श्रीशैल प्रचंडे, नितीन गावकर व विद्यार्थ्यांनी 27 खोदशिल्पांच्या शोधमोहिमेत भाग घेतला. प्राणी, पक्षी, सरीसर्प अशा रचना आहेत. आतापर्यंतच्या मोहिमेत अशा वेगळ्या रचना आढळलेल्या नाहीत. एक रचना 5 फूट बाय 4 फूट चौकोनात असून चौकोनाच्या बाह्यरेषेपासून चौकोनातील चित्रांपर्यंतचा भाग खोदला आहे व त्यातून मुख्य रचनेला उठाव दिला आहे. यात 2 मोर, हरिण वर्गातील प्राणी आहे. 15 फूट बाय 11 फूट रुंदीच्या भौमितिक रचनेचा पट असून सर्वात मोठे शिल्प आहे. त्यामुळे ही रचना ठसठशीत दिसते.

कोकणात आढळून येणाऱ्या कातळखोदशिल्पांची शैली भारतात अन्यत्र आढळणाऱ्या रचनेपेक्षा भिन्न आहे. भारताबाहेर पोर्तुगाल, इजिप्त, ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या अशा प्रकारच्या रचनांची शैली व कोकणातील शैलीत साधर्म्य आढळले आहे. बारसूच्या सड्यावर आढळून आलेली सुमारे 57 फूट लांबीची शिल्परचना अशा प्रकारच्या शैलीतील भारतातील सर्वात मोठी शिल्परचना असल्याचे दिसून आले आहे. निवळी, भडे इतर 8 ठिकाणी आढळलेले चौकोनी आकाराच्या भौमितिक संरचनेच्या भव्य शिल्परचना अन्यत्र कोठेही आढळून येत नाहीत. जांभ्या दगडात चुंबकीय विस्थापन दशर्वणारी देवाचे गोठणे हे भारतातील एकमेव ठिकाण आहे. आढळून आलेल्या सर्व ठिकाणांवरील किमान एक रचना अन्यत्र आढळणाऱ्या रचनांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

42 गावांत 600 कातळ खोदशिल्पे...
सुधीर रिसबूड यांनी "आडवळणावरील कोकण' संकल्पनेवर कामाला सुरवात केली. धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांच्या मदतीने त्यांनी रत्नागिरी, राजापूर, लांजा तालुक्‍यातील 42 गावांतील 57 ठिकाणी 600 खोदशिल्पे शोधली अजूनही यात वाढ होणार आहे. गावामध्ये खोदशिल्पांचा संदर्भ गोळा करणे, चौकशी करून मित्रमंडळी, ज्येष्ठ गावकऱ्यांकडून खात्री करणे व नंतर ती शोधून काढून नोंद करणे, नकाशे तयार करण्याचे काम केले जाते.

""राजापूर लॅटेराईट टर्फ हा राजापूर शहरासह पंचक्रोशीतील गावांना कुशीत घेतलेला विस्तीर्ण सडा आहे. गोवळ, देवाचेगोठणे, सोलगाव, बारसू, देवीहसोळ या गावांच्या या सड्यावर ही कातळ खोदशिल्पे आहेत. बारसू, पन्हळेच्या सड्यावर 4 ठिकाणी 37 शिल्पे आढळली. यात 20 फूट बाय 18 फुटांचे चौकोनी शिल्पपट व शेजारी लज्जागौरीची रचना आहे. या दोन्ही शिल्पांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. बहुतांशी सर्व रचना आतापर्यंतच्या शिल्पांपेक्षा वेगळ्या आहेत.''
- सुधीर रिसबूड, अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com