लाकडी खेळण्यांवर सावंतवाडीत संक्रांत

लाकडी खेळण्यांवर सावंतवाडीत संक्रांत

लाकडी खेळण्यांचा नावलौकीक
सावंतवाडीची लाकडी खेळणी ही या शहराची ओळख आहे. या कलेला राजाश्रय लाभला. पूर्वी शहरात केळकर, म्हापसेकर, देऊलकर यांचे लाकडी खेळणी बनविण्याचे कारखाने होते. संस्थान काळात शिवरामराजे भोसले व पुण्यश्‍लोक बापूसाहेब महाराजांनी खेळण्यांना राजाश्रय मिळवून दिला. त्यामुळे लाकडी खेळणी बनविणाऱ्या कारागिरांना मदत मिळायची. गोवा राज्य विलीनीकरणानंतर खऱ्या अर्थाने सावंतवाडी लाकडी खेळण्यांची बाजारपेठ बनली. काणेकर यांनी या परिसरात पहिले दुकान थाटले. त्यानंतर परंपरेनुसार लाकडी खेळणी बनविण्याचे व विक्री करण्याचे काम वाढत गेले. चितारआळीत लाकडी खेळण्याची छोटेखानी बाजारपेठ तयार झाली. हळूहळू ती खरेदी करण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढू लागला.

शहराबाहेरची बाजारपेठ...
सुरवातीला संस्थानकाळात पाटाचा कारखाना असायचा. या काळातच लग्न सोहळ्यासाठी लाकडी रंगीत पाटाची मागणी वाढली. मुुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, पंढरपूर याठिकाणी हे पाट पाठविण्यात यायचे. त्यानंतर हळूहळू बेळगाव, सातारा, सांगली या ठिकाणीही रंगीत पाटाला मागणी वाढू लागली. त्यानंतर पाटासोबत लाकडी खेळणीही उपलब्ध झाल्यामुळे पाटाची मागणी असलेला पर्यटक हळूहळू कमी होऊन लाकडी खेळण्याचा ग्राहक वाढत गेला.

झाराप-पत्रादेवी महामार्गाचा परिणाम...
१९८१ मुंबई गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी असा महामार्ग प्रास्तावित होता. त्यानंतर युती काळात १९९९ नंतर जमीन संपादन प्रक्रिया झाली. २००० नंतर या महामार्गाच्या बांधकामास सुरवात करण्यात आली. २०१४-१५ पासून या मार्गावरून गाड्या धावू लागल्या. या महामार्गामुळे मुंबई-गोवा मार्गावरील प्रवासात वेळ कमी लागू लागला. पूर्वीच्या शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गापेक्षा या महामार्गाचा वापर पर्यटन व प्रवासी करू लागले. जरी पर्यटकाला शहरात यायचे असेल, तर झाराप येथून किंवा मळगाव बॉक्‍सेल खालून यावे लागे; मात्र या झाराप पत्रादेवी महामार्गामुळे शहरातून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ हळूहळू कमी होऊ लागला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांचे दर्शन करण्यात येत असतात. त्यात जिल्ह्याला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सागरी पर्यटन वाढले; मात्र याबरोबरच सावंतवाडीच्या वैशिष्ट्याप्रमाणे व्यावसायिक स्वरूपाचे पर्यटन येथे वाढले नाही. संपूर्ण जिल्ह्यात फक्त येथेच लाकडी खेळण्याची सुसज्ज बाजारपेठ आहे; पण महामार्ग बाहेरून गेल्यानंतर यालाही मंदीचा फटका बसला. ही बाजारपेठ टिकविण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. कारण यामुळे प्राचीन कलेची जोपासना आणि विकास होणार आहे.

वेगळी ओळख...
वेंगुर्ले, देवगडचा हापूस ज्याप्रमाणे पूर्ण देशात प्रसिद्ध आहे तशीच सावंतवाडीच्या खेळण्यांनी ओळख निर्माण केली. ती पूर्ण देशात प्रसिद्ध झाली. शहरातून जाणाऱ्या या मुंबई-गोवा महामार्गावरून जाणारा प्रत्येक पर्यटक मोती तलाव परिसर, राजवाडा पाहण्यासाठी यायचा. याचवेळी तो आवर्जून ही लाकडी खेळणी पाहाण्याबरोबरच मोठ्या आवडीने खरेदीही करायचा. शहरात जास्तीत जास्त मुंबई, गोव्यासोबत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील तसेच कर्नाटकमधील पर्यटक शहराला भेट देऊ लागले. गोवा-मुंबई मार्गावरील प्रत्येक प्रवासी पर्यटकाला सावंतवाडीला भेट देण्याची ओढ लाकडी खेळण्याच्या माध्यमातून असायची.

पर्यटन स्थळांवर बाजारपेठ
सावंतवाडीतील प्रसिद्ध लाकडी खेळण्याला याच शहरातच नाही तर आपल्या जिल्ह्यातील इतर ठिकाणीही बाजारपेठ मिळू लागली. जिल्ह्यातील असलेल्या समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी इथल्या लाकडी खेळण्याचा माल विक्रीस उपलब्ध होऊ लागला. त्याठिकाणीही मोठ्या आवडीने विविध प्रकारच्या लाकडी वस्तू खरेदी करू लागले. यात शोभेच्या वस्तू, आकर्षित करणाऱ्या विविध वस्तू, शोपिस, लाकडी अलंकारीक वस्तू, टोप्या, खेळणी असे विविध प्रकार विक्रीस उपलब्ध होऊ लागले. गोव्याच्या विविध पर्यटनस्थळी तिथले विक्रेते माल विकू लागले. त्या ठिकाणी ठरलेल्या दराने ही विक्री होत असे.

प्रयत्न तोकडे...
तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसकर यांनी दहा वर्षांपूर्वी पर्यटनाला गती मिळावी, यादृष्टीने लाखो रुपयेही खर्ची घालण्यात आले. हे प्रकल्प लाकडी खेळण्यासारख्या हस्तकलेला प्राधान्य देणारे होते, मात्र हे प्रकल्प चालविणारेही कोणी नसल्यामुळे प्रकल्प इमारत उभारण्यापुरतेच मर्यादित राहिले. शहर पर्यटनाच्या दृष्टीने पालिका आणि राज्य शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. लाकडी खेळण्यासारख्या मक्तेदारी असलेल्या कलेवर मंदीचे सावट असेल तर इतर व्यवसायांची काय स्थिती असणार याची कल्पनाच न केलेली बरी.

‘पंगारा’लागवडीची गरज...
शहरात पालिकेकडून वृक्षलागवड करण्यात येते. त्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात शहरवासीयांकडून वृक्ष लावण्यात येतात. यात बरेचसे साग व अन्य प्रकारच्या वृक्षांचा समावेश असतो. पंगाराच्या वृक्षाचे संर्वधन झाल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. यात पालिकेने पुढाकार घेणे आवश्‍यक असल्याचेही बोलण्यात येत आहे.

कलाकार घडावेत...
लाकडी खेळणीचे पर्यटनातील स्थान टिकविण्यासाठी आदी कारखाने कारागीर निर्माण होणे आवश्‍यक आहे. याचा विचार करून आजच्या युवा पिढीसाठी लाकडी खेळणी व्यवसायावर कार्यशाळा होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे बरेच तरुण युवक या व्यवसायाकडे वळू शकतात.   खेळण्याची बाजारपेठ उदयास येईल.

माहीतगारच वळतात शहराकडे
पर्यटकांचा हळूहळू ओघ कमी होत गेला. सद्य:स्थिती पाहता झाराप पत्रादेवी महामार्ग होण्याआधी जेवढा ग्राहक वर्ग लाकडी खेळणी किंवा शहराकडे येत असे, त्यातील जवळपास १० ते १५ टक्के ग्राहक किंवा पर्यटक कमी झाला असल्याचे काही विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे ज्या पर्यटकांना सावंतवाडीची लाकडी खेळणी माहीत आहेत. तोच ग्राहक व पर्यटक शहराकडे आपली पाऊले वळवितो. शहराची लाकडी खेळणी म्हणून ओळख माहीत आहे; मात्र ती पाहण्याआधीच बराचसा पर्यटक शहराबाहेरूनच जातो. याला झाराप पत्रादेवी महामार्गच ठरला आहे. हाच मार्ग शहरातून गेला असता तर मुंबई गोवा मार्गावरील पर्यटकातही वाढ झाली असती.

रोजगारनिर्मितीला संधी...
लाकडी खेळणी तयार बनविण्याचे कारखाने पूर्वी होते. आजही काही प्रमाणात आहेत; मात्र शहराच्या आसपासच्या भागात जर लाकडी खेळणी बनविणारे कारखाने निर्माण झाले, तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. लाकडी खेळणी तयार करणे कारखाने करून त्यात कारागीर ठेवल्यास मोठा रोजगारही शहरातील बऱ्याच बरोजगारांना मिळू शकतो. याचा विचार होणे आवश्‍यक आहे. कारखाने तयार करण्याबरोबरच त्याना शासनाकडून अनुदानही मिळणे तितकेच आवश्‍यक आहे. त्यामुळे कारागीर व कारखानदार लाकडी खेळणी बनविण्याकडे वळतील.

झाराप पत्रादेवी बायपास बाहेरून गेल्यामुळे मोठा परिणाम सावंतवाडीतील व्यापारावर दिसून आला आहे. या बायपासमुळे १० टक्केच्या आसपास ग्राहकांवर हा परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरी पर्यटनावरही याचा बराच फरक दिसून येत आहे. शहराच्या लाकडी खेळण्याचा पर्यटनात मोठा वाटा आहे. याचा विचार शासन स्तरावर करून रोजगार वाढीसंदर्भात विचार होणे आवश्‍यक आहे.
- शशिकांत काणेकर,
लाकडी खेळणी विक्रेते.

बायपास झाल्यामुळे जर काही घ्यायचच नाही, तर शहरात का जायचे, असा विचार पर्यटक करत आहेत. शहरातील प्रकल्पही बंदावस्थेत आहेत. ते चालू असते तर लाकडी खेळणी व्यावसायाच्या पर्यटनास फायदा झाला असता. बायपासमुळे लाकडी खेळण्यासोबत इतर व्यावसायांनाही फटका बसला आहे. पर्यटक यायला हवे तर पालिका किंवा शासनातर्फे बंद असलेले प्रकल्प पुन्हा चालु करणे आवश्‍यक आहे.
- राघवेंद्र चितारी,
लाकडी खेळणी विक्रेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com