आशियाई विजेती गोलरक्षक नोकरीच्या शोधातच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

आपले क्रीडामंत्री ऑलिंपिक पदकविजेते आहेत. ते माझी अवस्था काय आहे ते समजू शकतील. आशिया विजेतेपदामुळेही माझा नोकरीचा प्रश्‍न सुटेल, अशी आशा आहे. 
- सविता पुनिया, भारतीय महिला हॉकी गोलरक्षक

नवी दिल्ली - भारतीय गोलरक्षक सविता पुनिया हिने आशिया कप विजेतेपदात मोलाची कामगिरी बजावली. पण तिचा नऊ वर्षांपासून सुरू असलेला नोकरीचा शोध या विजेतेपदानंतरही संपलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकविजेत्या खेळाडूंना नोकरी देण्यात आघाडीवर असलेल्या हरियाना आघाडीवर असले, तरी हरियानाची असूनही सविता नोकरीच्या शोधात आहे.

सडनडेथवर चीनचा गोलचा प्रयत्न हाणून पाडत सविताने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिच्या या कामगिरीमुळे भारताने १३ वर्षांनंतर आशिया महिला हॉकीत बाजी मारली; तसेच विश्‍वकरंडकासाठी थेट प्रवेशही मिळविला. गतस्पर्धेस भारत पात्र ठरला नव्हता.

भारताच्या विजयात माझाही सहभाग आहे. त्याचा मला नक्कीच आनंद अन्‌ समाधानही आहे. भारताची कामगिरी उंचावण्यासाठी मी सातत्याने कष्ट करीत आहे. भारताच्या अनेक यशांत सहभाग असूनही अजूनही मला कोणी नोकरी दिलेली नाही; पण त्याचा माझ्या खेळावर कोणताही परिणाम होणार नाही, याकडे माझे लक्ष असते, असे तिने सांगितले.

‘मेडल लाओ, नौकरी पाओ’ योजनेखाली हरियाणा सरकारने नोकरीचे आश्‍वासन दिले आहे; पण कित्येक वर्षे  अधिकारी आश्‍वासनच देत आहेत. मी आता २७ वर्षांची आहे. तरीही अजूनही पूर्णपणे वडिलांवर अवलंबून आहे.

नऊ वर्षांपासून देशाकरिता खेळत आहे. प्रत्येक विजयानंतर नोकरी मिळेल, अशी आशा वाटते; पण काहीच होत नाही, असे तिने हताशपणे सांगितले. 
खरे तर आता मी आई-वडिलांची काळजी घ्यायला हवी; पण उलटेच आहे.

माझे वडील फार्मासिस्ट आहेत. सध्याच्या परिस्थितीत एकाच्या जीवावर कुटुंब चालत नाही. रिओ ऑलिंपिकनंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणातही नोकरीसाठी अर्ज केला; पण त्यांचेही काही उत्तर नाही. कधी कधी घरची अवस्था पाहून खूपच टेन्शन येते. मला नोकरी नसल्यामुळे आईला माझी जास्तच चिंता वाटते. वडील खेळण्यावरच लक्ष केंद्रित करायला सांगतात. मी कधीही मैदानावर असताना नोकरी नसल्याचा विचार करीत नाही; पण मैदान सोडल्यावर हे विचार मनात येतातच, असेही हताश सविताने सांगितले.