विराट कोहली हाच जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज: मोहम्मद आमीर

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

"स्पॉट फिक्‍सिंग' प्रकरणानंतर हकालपट्टी करण्यात आलेल्या आमीर याच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुनरागमनाचे कोहली याच्याकडून मनापासून स्वागत करण्यात आले होते. आमीर व कोहली यांच्यामध्ये परस्पर आदरावर आधारलेले मैत्रीपूर्ण नाते यापूर्वीही अनेकदा दिसून आले आहे

नवी दिल्ली - भारतीय कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे मत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याने व्यक्त केले आहे.

जो रुट, स्टीव्हन स्मिथ आणि केन विल्यमसन यांच्यापेक्षा कोहली हा अधिक चांगला फलंदाज असल्याचे आमीर याने ट्विटरवरील "चॅट सेशन' दरम्यान सांगितले. ""हे चारही फलंदाज चांगले आहेत. मात्र कोहली हा सर्वोत्कृष्ट असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे,' असे आमीर म्हणाला.

आमीर याने नुकत्याच झालेल्या चॅंपियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात टाकलेल्या तुफान "स्पेल'मध्ये कोहलीसहित शिखर धवन व रोहित शर्मा यांना बाद करत पाकिस्तानच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता. या सामन्यात पाकने भारतास तब्बल 180 धावांनी पराजित केले होते.

"स्पॉट फिक्‍सिंग' प्रकरणानंतर हकालपट्टी करण्यात आलेल्या आमीर याच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुनरागमनाचे कोहली याच्याकडून मनापासून स्वागत करण्यात आले होते. आमीर व कोहली यांच्यामध्ये परस्पर आदरावर आधारलेले मैत्रीपूर्ण नाते यापूर्वीही अनेकदा दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर, आमीर याने व्यक्त केलेले हे मत स्वागतार्ह मानले जात आहे.