#SakalForMaharashtra एकत्र येऊया ! मार्ग काढूया !!

sakal
sakal

शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
- संपादक #SakalForMaharashtra

आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्‍न पोटापाण्याशी संबंधित आहेत. 

शेती योग्य पद्धतीने न केल्याने ती संकटात आहे व त्यामुळे तिच्यावर अवलंबून असलेले समाजघटक अधिक अस्वस्थ आहेत, तर शिक्षण व नोकरी-उद्योगांसाठी आवश्‍यक असलेले कौशल्य आत्मसात करणे अवघड बनल्यामुळे मुलामुलींचे पालक चिंतेत आहेत. अशावेळी, समाजाची अस्वस्थता वाढविणाऱ्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्याबरोबरच भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी समाजानेच एकत्र यावे, केवळ सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता बदलावी, यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. 

या दृष्टीने येत्या काही दिवसांत सकाळच्या माध्यमातून समाजातील गरजू तरुण, महिला व अन्य घटक आणि त्यांना मदत करू इच्छिणाऱ्या सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांना एकत्र आणणारी एक व्यवस्था उभी केली जाईल. ग्रामीण व शहरी भागात कौशल्यविकास व स्टार्टअप उभारणीचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्‍यक सरकारी धोरण व निर्णयांसाठी राज्य व केंद्र सरकारबरोबर काम केले जाईल. सकाळ-ॲग्रोवन हे शेतीला वाहिलेले देशातील एकमेव दैनिक आणि तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियान हे महिलांसाठी, तर यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क हे युवकांचे व्यासपीठ, नैसर्गिक आपत्तीच्या काळात समाजाच्या मदतीला धावून जाणारे सकाळ रिलीफ फंड व सकाळ सोशल फाउंडेशन अशा परंपरेतील हे नवे व्यासपीठ उपलब्ध करण्यात येणार असून तेथे मदतीची गरज असलेल्यांची नोंदणी केली जाईल आणि त्यांना मदत करू इच्छिणाऱ्या सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांची सांगड घातली जाईल.

विशेषत: महाराष्ट्रात शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी आणि त्यामाध्यमातून निर्यात व कृषी प्रक्रिया उद्योगांना मोठा वाव असल्याने त्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. सकाळ-ॲग्रोवनच्या स्मार्ट व्हीलेज प्रकल्पाला जोडून राज्याच्या विविध भागांत अशा कंपन्यांसाठी तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. त्यांना प्रशिक्षित करण्यात येईल आणि वित्तपुरवठ्यापासून ते निर्यातक्षम उत्पादनांपर्यंत त्यांना विविध टप्प्यांवर मदत करणारी यंत्रणा उभारली जाईल.

भविष्यातील आव्हानांचा वेध 
केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर जगभर नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहेत. पारंपरिक नोकऱ्या जाऊन नव्या येत आहेत. यांत्रिकीकरणासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रामुळे ही समस्या पुढे आणखी जटील बनणार आहे. केवळ कार्यालयीन किंवा कारखान्यातील कामच नव्हे तर अन्य व्यवसायही धोक्‍यात आहेत. या सगळ्यांचा विचार करून आपले शिक्षण, नोकरी, व्यवसायाची भविष्यातील दिशा निश्‍चित करावी लागणार आहे. ही जबाबदारी सरकारसोबतच समाजाचीही असल्याने तरुणांना अपारंपरिक नोकरी-व्यवसायाकडे, स्टार्टअप संस्कृतीकडे नेण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाईल. यासोबतच केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केल्या जाणाऱ्या नियुक्‍त्या किंवा पोलिस, कृषी सहायक, शिक्षक, आरोग्यसेवक वगैरे ज्या तत्सम नोकऱ्या उपलब्ध आहेत, त्यादेखील अंतिमत: गुणवत्तेच्या आधारावरच मिळणार असल्याने ती गुणवत्ता विकसित करण्याचाही प्रयत्न केला जाईल. 

महाराष्ट्रात जन्म घेऊन जगभर व्यवसाय करणाऱ्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची गाथा तरुणांपर्यंत पोचवावी. त्यातून स्वरोजगार निर्मितीची प्रेरणा मिळेल. ‘सकाळ’च्या चळवळीत योगदान देण्याची माझी तयारी आहे.
- हनुमंत गायकवाड, (अध्यक्ष, बीव्हीजी)
#SakalForMaharashtra मी तयार आहे, आपणही पुढे या!​

उद्योगांना हवे तसे मनुष्यबळ मिळत नाही. त्यामुळे ‘क्रेडाई’ने दहावी-बारावीतील उत्तीर्णांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे यापूर्वीच सुरू केले आहे. महिलांचाही त्यात समावेश केला आहे. यापुढील काळातही ‘स्कील एज्युकेशन’वर भर देईल. 
- श्रीकांत परांजपे, अध्यक्ष, क्रेडाई, पुणे

केवळ आंदोलनाने प्रश्‍न सुटणार नाही. स्वयंरोजगारासाठी सरकार काहीतरी करेल, याची वाट न पाहता सध्या जे व्यवसाय-उद्योग करीत आहेत त्यांनी एकमेकांना हात द्यायला हवा. यातून बदल घडतील. आरक्षण हा एकच मार्ग असू शकत नाही. त्याचा केवळ राजकारणासाठी वापर होतोय. यात सुधारणा करणे सर्वसामान्य नागरिकांच्याच हातात आहे.
- मंजूषा किवडे, गृहिणी

एखाद्या गावामध्ये जाऊन संगणक साक्षरतेसाठी पुढाकार घेता येईल. गावकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे कसा करायचा, याबद्दल सांगणे शक्‍य आहे. तरुणांना अभियांत्रिकी शिक्षणातील नव्या संधींची, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख करून देता येईल. महाविद्यालयीन तरुणांना करिअर मार्गदर्शन देणे शक्‍य आहे.
- दानिश शेख, संगणक अभियंता

पुस्तकातील शिक्षण आणि व्यावहारिक शिक्षण यामध्ये अनेकदा अंतर पडल्याचे दिसून येते. त्यामुळे अभियंते किंवा पदवीधर युवकांनाही नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी नोकरी-व्यवसायाला उपयुक्त पडेल, अशा पद्धतीचे शिक्षण मिळणे गरजेचे असून, तांत्रिक व पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्येच बदल व्हायला हवा. त्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतल्यास माझा त्यासाठी पाठिंबा असेल. 
- अनंत डांगरे, व्यावसायिक

आपणही सेवा देऊ शकता...
 समाजाचे आपण काही देणे लागतो, या कृतज्ञ भावनेतून गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ शकता.
 जे जे आपल्याला ठावे, ते इतरांना शिकवावे, या उक्‍तीनुसार तरुण-तरुणींच्या कौशल्यविकासासाठी ‘वर्किंग प्रोफेशनल्स’ वेळ देऊ शकतात.
 आयुष्यात चाकोरीबाहेरचे काही करू पाहणाऱ्या नव्या पिढीला नव्या संधी निर्माण करू शकता. 
 शेतमालावरील प्रक्रिया व अन्य उद्योग उभारणीसाठी ‘सकाळ’च्या पुढाकाराने छोटेछोटे मेळावे घेऊ शकता.
 आपले गाव, तालुका, जिल्हा स्तरावर स्टार्टअपस उभारू इच्छिणाऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत, गुंतवणूक करू शकता.
 शिक्षणसंस्थांमध्ये गुणवान युवक-युवतींसाठी इन्क्‍युबेशन व इनोव्हेशनची सुविधा निर्माण करू शकता.

हे अभियान कोणत्याही जातीधर्मापुरते मर्यादित नसून गरजूंना मदत करण्यासाठी सर्वच समाजघटकांनी पुढे यावे, अशी अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com