सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

राजीनाम्याबाबत मी शुक्रवारी रात्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मी आज सकाळी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला. मात्र, त्यांनी स्वीकारला नाही. या प्रकरणी मी चौकशीसाठी तयार असून, त्यानंतर जोकाही निर्णय असेल तो मान्य असेल.

पुणे : एमआयडीसी जमीन गैरव्यवहारप्रकरणी अडचणीत आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज (शनिवार) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजीनामा दिला; मात्र हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नसल्याचे समोर येत आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुभाष देसाई म्हणाले, की राजीनाम्याबाबत मी शुक्रवारी रात्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मी आज सकाळी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला. मात्र, त्यांनी स्वीकारला नाही. या प्रकरणी मी चौकशीसाठी तयार असून, त्यानंतर जोकाही निर्णय असेल तो मान्य असेल.

गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांची चौकशी राज्याच्या लोकायुक्तांमार्फत, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शुक्रवारी केली. मात्र, या निर्णयावर विरोधकांचे समाधान झाले नाही. महेता आणि देसाई या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.