क्रांतिदिनी मुंबईत घुमणार मराठ्यांचा निःशब्द एल्गार; दहा लाखांहून अधिक नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

मोर्चाची जय्यत तयारी; गटतट संपले, सगळेच कामाला लागले
मुंबईतील महामोर्चासाठी मराठा समाजातील काही स्वयंभू नेत्यांनी परस्पर नियोजनाचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, आता मराठा समाजाच्या सर्वच संघटना, राजकीय नेते व संस्था यांच्यात समेट झाला असून, सर्वजण एकदिलाने कामाला लागले आहेत. मोर्चात सहभागी होणाऱ्या समाजबांधवांना सेवा व सुविधा पुरवण्यासाठी सर्वजण खांद्याला खांदा लावून हिरिरीने सहभागी झाल्याचे चित्र आहे.

मुंबई : राजधानी मुंबईत 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी "एक मराठा, लाख मराठा'चा निःशब्द एल्गार घुमणार असून, राज्यभरात या महामोर्चाची जय्यत तयारी झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाचा मुंबईतला महामोर्चा भव्य होईल यासाठी प्रचार व प्रसाराची गावोगावी तयारी सुरू असून, मुंबईसह राज्यभरात बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आजपर्यंत विविध जिल्ह्यांतील समन्वय समितीच्या माध्यमातून सुमारे दहा लाख मराठ्यांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी नोंदणी केल्याची माहिती आहे, त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

"मुंबई- पुणे एक्‍स्प्रेस वे'वरून पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील गाड्या येणार असल्याने एका लेनवरून मराठा क्रांती मोर्चाची वाहने राहतील यासाठी समन्वय समितीकडून सूचना देण्यात आल्या आहेत. तर, मुंबईत चेंबूर ते डॉकयार्ड दरम्यानची संपूर्ण मार्गिका मोर्चकऱ्यांच्या वाहनांनी व्यापण्याची शक्‍यता आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या मार्गावरून महामोर्चा जाणार असून यासाठी दोन हजार मराठा स्वयंसेवकांची टीम मोर्चाचे नियंत्रण करण्यासाठी सज्ज आहे.

मुंबईतल्या तिन्ही लोकल मार्गांवर प्रत्येक स्थानकावर मराठा रेल स्वयंसेवक देखील तैनात राहणार आहेत. तर, नाशिक व ठाण्याकडून येणाऱ्या महामार्गावर सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही यासाठी एका लाइनवरुन क्रांती मोर्चाची वाहने यावीत यासाठीची आचारसंहिता देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईत बीपीटी सिमेंट यार्ड व वडाळा ट्रक टर्मिनल या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोर्चात प्रचंड संख्येने मराठा समाज सहभागी होणार असल्याने दक्षिण मुंबईत सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक यंत्रणेवर मोठा ताण पडण्याची शक्‍यता आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने मोर्चासाठी आवश्‍यक त्या सेवा व नियंत्रण पुरवण्याची तयारी देखील दर्शविली आहे. तर, पोलिस प्रशासनाच्या वतीने उद्या सायंकाळपर्यंत मोर्चाच्या नियोजनाची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल, असे समन्वय समितीकडून कळवण्यात आले आहे.