PNB गैरव्यवहार: मनोज खरात मासा की बकरा?

MANOJ_KHARAT_PNB
MANOJ_KHARAT_PNB

साधा क्लार्क म्हणून पंजाब नॅशनल बँकेत रुजू झालेल्या मनोजला आम्ही मागच्या दहा-बारा वर्षांपासून ओळखतो. करिअर, विपश्यना, गड किल्ले आणि संगीत अशा विषयात त्याची नेहमीच रुची राहिलेली आहे. नगर जिल्ह्याच्या कर्जतमध्ये मुंबईपासून जवळपास 300 किलोमीटरवर त्याचे आईवडील राहतात. दुसऱ्या आणि चवथ्या शनिवार-रविवारची वाट पाहत बँकेत त्याची ३-४ वर्ष गेली. दुर्दैवं म्हणजे मागच्या ४ वर्षात ज्या या क्लार्कचा पगार कधी २२ हजाराच्या वर नाही गेला असा हा कनिष्ठ दर्जाचा कर्मचारी ११५०० कोटींच्या घोटाळ्यात सीबीआयच्या कस्टडीत आज निर्दय दिवस मोजतोय.

स्वातंत्र्यानंतरच्या बँकींगमधील या सगळ्यात मोठ्या घोटाळ्यात तब्बल आठवड्यानंतर राजेश जिंदाल हा उच्च दर्जाचा पहिला अधिकारी सीबीआयने पकडला. हा २००९ ते २०११ या कालावधीत बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेचा मॅनेजर होता. ज्या LoU चं खापर मनोज खरातच्या माथ्यावर फोडलं जात त्याची बाराखडी तब्बल ६ वर्षांपूर्वीपासूनच बँकेत गिरवली जातेय. मुळात मनोज खरात हा नोव्हेंम्बर २०१४ ला नोकरीत रुजू झालाय हे लक्षात घेण्यासारखं आहे.

ज्यांना कुणाला हा घोटाळा समजून घ्यायचाय त्यांनी बँकेच्या कामासंबंधी असलेली 'कोअर बँकींग सेवा', SWIFT काय आहे किंवा LoU कशासाठी असतात हे थोडं समजून घेणं आवश्यक आहे. सध्या बँकेच्या निरनिराळ्या ब्रँचमधील कामात समन्वय साधण्यासाठी ही 'कोअर बँकींग सेवा' जवळपास सर्वच बँका वापरतात. बँकेत ज्या संगणकापुढे बसून कर्मचारी काम करतात ती कामं Finacle या सॉफ्टवेअरमध्ये चालतात. हा कोअर बँकींग यंत्रणेचा भाग आहे. 

SWIFT सेवा नेमकी काय आहे?

  • SWIFT ही परदेशातील बँकेत Encrypted मेसेज देवाणघेवाण करण्याची बँकींग सोसायटीची यंत्रणा आहे. 
  • एखाद्या व्यक्तीला पुण्यातील डेक्कन SBI शाखेतून न्यूयॉर्कच्या HDFC शाखेत पैसे पाठवायचे असतील तर संबंधित व्यक्तीकडे दोन्ही अकाउंट नंबर आणि HDFC बँकेच्या त्या ब्रँचचा SWIFT कोड असणे आवश्यक आहे. 
  • बँकेचे LoU म्हणजे 'लेटर ऑफ अंडरटेकींग' ! ही एक बँक गॅरंटी असते ज्यावर परदेशातील बँक त्या कस्टमरला लोन मंजूर करते. 

पंजाब नॅशनल बँकेत अशा LoU या SWIFT मधून पारीत केल्या जायच्या. त्याची वैधता ही नियमानुसार ९० दिवस असते ती पीएनबी केसमध्ये काही LoU साठी 365 दिवस झाली आहे.
 
SWIFT Transaction असे चालते...

  • बँकेमधून SWIFT Transaction ची सुरवात करण्यात त्याच बँकेतील 3 लोकांचा सहभाग असतो. 
  • तांत्रिक भाषेत Maker (मेकर) हा त्या व्यवहाराची सुरवात करतो
  • Checker (चेकर) हा त्यात आवश्यक ते बदल करतो 
  • Verifier (व्हेरिफायर) तो असतो जो SWIFT Transaction परदेशातील बँकेसाठी जारी करतो. 

मनोज खरात हा क्लार्क असल्याने त्याचा यात मेकरचा रोल आहे. ज्याचा कॉमन सेन्स जराही जागा आहे त्या कुणाही व्यक्तीला हे लगेच लक्षात येईल की इतका साधा क्लार्क एवढ्या मोठ्या बँकेत कुणाच्या तरी सांगण्यावरूनच हा व्यवहार चालू करेल. त्यात मनोज हा फ्रेशर म्हणून रुजू झालेला असल्याने त्याला या कामाची ना कोणती ट्रेनिंग दिली गेलीय ना कोणता कोर्स करण्याची बँकेने त्याच्याकडे मागणी केलीय.

यात पकडल्या गेलेल्या लोकांमध्ये पंजाब नॅशनल बँकेतील बच्चू तिवारी हा फॉरेक्स डिपार्टमेंटचा चीफ मॅनेजर ज्याला सीबीआयने गोकुलनाथ शेट्टीचा superviser म्हणून अटक केली. सीबीआयने ताब्यात घेतलेली दुसरी व्यक्ती म्हणजे यशवंत जोशी, याची जबाबदारी ही होती की CBS आणि SWIFT च्या एंट्रीची दररोजच्या दररोज पडताळणी करणे. जी मागच्या ७ वर्षांत कधीही झाली नाही. शेट्टीने ज्या फ्रॉड LoU नीरव मोदीच्या कंपन्यांना जारी केल्या त्याची सगळी खबर या यशवंत जोशीला होती. सीबीआयने अटक केलेला तिसरा ऑफिशियल म्हणजे प्रफुल सावंत याची जबाबदारी SWIFT मेसेज दररोज चेक करणे आणि त्याचा रिपोर्ट बनवणे जी त्याने 'इमानइतबारे' पार पाडली. स्वतः फ्रॉड LoU जारी करणाऱ्या आणि गेली सहा-सात वर्षे बँकेच्या यंत्रणेचा हवा तसा उपयोग करणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लेत हे स्वतः शेट्टीने सीबीआयपुढे कबूल केले. यात मनोज खरातच्या भविष्याशी निगडित प्रश्न असा आहे की यात त्याची भूमिका काय? स्वतः सीबीआयच्या चौकशीत त्याचाविरुद्ध पैसे खाल्ल्याचा एकही पुरावा नाही. विशेष म्हणजे पंजाब नॅशनल बँक कर्मचारी संघटनेने जाहीरपणे त्याच्या 'स्वच्छ' असण्याची ग्वाही दिली आहे.

तर हा फ्रॉड उघडकीस आला तरी कधी? तर पीएनबीच्या LoU नुसार हाँगकाँमध्ये अलाहाबाद आणि अॅक्सिस बँकेकडून जेव्हा नीरव मोदीच्या कंपन्यांना पेमेंट केली गेली आणि LoU ची वैधता संपूनही पीएनबीकडून रक्कमेचा परतावा आली नाही तेव्हा..! बँकेच्या नियमानुसार LoU पारीत करण्यासाठी नीरव मोदीकडूनही रकमेचा काही भाग बँकेत जमा करणे आवश्यक होतं. पण तशी कोणतीही अट न ठेवता त्याच्यासाठी फ्रॉड LoU तयार करण्यापर्यंत अधिकारी जीव तोडून मेहनत घेत होते. हे सर्व अधिकारी ११५०० कोटी रुपये नीरव मोदीच्या कंपन्यांना का पोहोचवत होते हे या देशात नाक पुसणाऱ्या लहान मुलालाही सांगता येईल. यात दुर्दैवी बाजू अशी की नाहक फरफटत गेलेल्या 'मनोज खरात'सारख्या तरुणाच्या आईवडिलांची पोटाची भूक मारली गेली. त्यांच्या कर्जतच्या घराला कुलूप लावून मुंबईत वकील शोधण्याची रडकुंडीला आणणारी धावपळ झाली आणि सीबीआयने पोराला नक्की कुठं नेलंय यासाठी आठवणाऱ्या प्रत्येकाला फोन करत सुटण्याची हालहाल करणारी परवड झाली.

खूप गंभीरपणे घेण्याची गोष्ट अशी की ज्यादिवशी पंजाब नॅशनल बँकेच्या अंतर्गत हा घोटाळा उघडकीस आला आणि बँकेकडून FIR दाखल करण्याची तयारी झाली तेव्हा मॅनेजमेंटने लढवलेली नामी शक्कल म्हणजे ११५०० कोटीच्या घोटाळ्यात मनोज खरात या क्लार्कचं किंबहुना अती कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्याचं नाव देऊन 'मी नाय त्यातली..'ची भूमिका वठवण्यात आली. यावर कडी म्हणून परदेशातून नीरव मोदीनी पत्र पाठवून आमची Brand Value संपवली म्हणून पीएनबीची कानउघाडणी केली. व्हाईट कॉलर निर्ढावलेला गुन्हेगाराने कसं वागावं तर हे असं ! यापुढे स्वतःच्या यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे काळे डाग पुसायला पीएनबीच्या मॅनेजमेंटकडून बँकेतील चपराश्यावर किंवा कॅशीअरवर गुन्हा दाखल केला जाऊ नये अशी आशा करायला हरकत नसावी.

हिब्रूतील एका म्हणीनुसार 'एका माणसाचा जीव वाचवणं म्हणजे जग वाचवण्याबरोबर आहे'. निर्ढावलेला गुन्हेगारांकडून एका होतकरू मराठी तरुणाचा न्याययंत्रणेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बळी घेतला जाऊ नये यासाठी पंजाब नॅशनल बँकेची कामगार संघटना, त्याचे कुटुंबीय, सर्व मित्रपरिवार व हितचिंतक सनदशीर मार्गाने लढा देत आहेत.

दोन आठवढ्यापूर्वीच स्वतःचा साखरपुडा केलेला आणि अशा दुर्दैवी फेऱ्यात अडकलेल्या मित्रासाठी याच लढ्याचा एक भाग म्हणून या लेखाद्वारे मित्रपरिवाराकडून केलेला हा अल्पसा प्रयत्न !!

(लेखात मांडलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. संबंधित लेखातील मतांशी esakal.com सहमत असेलच असे नाही.)

आणखी वाचा :
नितीशकुमारांनी बंगल्यात भूतं सोडली ; तेजप्रताप यांचा दावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com