स्वच्छ अर्थव्यवस्थेला सुरवात - नितीन गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

मुंबई - नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) देशात स्वच्छ अर्थव्यवस्थेचा प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बॅंकांत नोटाबंदीनंतर जी रोख रक्‍कम जमा झालेली आहे, त्यातील अनेक खात्यांमध्ये गडबड आहे. या संशयित व्यवहारांची चौकशी होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिली. 

मुंबई - नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) देशात स्वच्छ अर्थव्यवस्थेचा प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बॅंकांत नोटाबंदीनंतर जी रोख रक्‍कम जमा झालेली आहे, त्यातील अनेक खात्यांमध्ये गडबड आहे. या संशयित व्यवहारांची चौकशी होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिली. 

नोटाबंदीच्या निर्णयाला वर्षपूर्ती होत असल्याच्या निमित्ताने भाजपतर्फे देशभरात काळा पैसाविरोधी दिवस पाळण्यात आला. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. ‘‘नोटाबंदीनंतर देशभरात दीड लाख लोकांनी पाच लाख कोटी रुपयांची रक्‍कम बॅंकेत जमा केली आहे. देशाच्या एकूण रकमेच्या एकतृतीयांश इतके याचे प्रमाण आहे. या खात्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. देश कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, असे गडकरी यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘नोटाबंदीनंतर बॅंकांतील १७.७३ लाख संशयित व्यवहारांची ओळख पटली आहे. ४.७ लाख रोख व्यवहार संशयित आढळले आहेत. प्राप्तिकर तसेच इतर संबंधित विभाग या सर्वांची चौकशी करणार आहेत. काळ्या पैशाविरोधात एका बाजूला कारवाई होत असताना दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांना देखील दिलासा मिळाला आहे.’’

टोलसाठी रांगेची गरज नाही
येत्या १ डिसेंबरपासून टोलनाक्‍यांवर टोल भरण्यासाठी रांग लावावी लागणार नाही. ‘फास्टटॅग’ नावाची यंत्रणा त्यासाठी राबविण्यात येणार आहे. रस्त्यावर नवीन येणाऱ्या प्रत्येक वाहनाला विशेष टॅग बसविण्यात येईल. जुन्या वाहनांना देखील हा टॅग लावण्यात येणार आहे. वाहन टोलनाक्‍यांवरून जाताना संबंधिताच्या खात्यातून या टॅगच्या माध्यमातून आपोआपच ही रक्‍कम वळती होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

‘राहुल गांधी बेराजगार’
राहुल गांधी यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून नोटाबंदीवर टीकास्त्र सोडले आहे. त्याबद्दल विचारले असता, सत्ता गेल्याने राहुल गांधी आता बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे टीका करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच उरलेले नाही. नोटाबंदी करून आम्ही काळ्या पैशावर प्रहार केला आहे. यामुळे ज्यांना दुःख झाले तेच टीका करत असल्याचा टोला नितीन गडकरी यांनी या वेळी मारला.