धूर आहे तेथे आग असणार? 

बुधवार, 2 ऑगस्ट 2017

बॉलिवूडप्रमाणे राजकारणालाही ग्लॅमर आहे. सत्ता, संपत्ती, थाट, अलिशान गाड्या, कार्यकर्त्यांची फौज हे सर्वच आले. नेत्यांना भेटणारे तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. तरीही आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न हा करायला हवा. कुठे, कधी आणि कोणाला भेटायचे? याची दक्षता घ्यायलाच हवी. आजचे जग हे तंत्रज्ञानाचे. तुम्ही काहीही बोलला तरी ते रेकॉडींग होते. तो पुरावा असतो. आपली फसगत होईल हे ही का लक्षात घेतले जात नाही. 

महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत अनेक चारित्र्यवान नेते होऊन गेले. आजही असे अनेक नेते आहेत की त्यांच्यावर कोणीही चारित्र्याचे शिंतोडे उठविण्याची हिंमत दाखविली नाही. रोहित टिळक यांच्यानंतर मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. याबाबत सत्य बाहेर येईलच पण, आपल्या चारित्र्यावर कदापि शिंतोडे उडणार नाही याची काळजी प्रत्येक नेत्याने घ्यायला हवी की नको !

राजकारण हे शंभर टक्के शुद्ध नाही. राजकारणाच्या फडातील सर्वच नेते आदर्शाचे पुतळेही नाहीत. येथेही हौसे, नसवे आणि गवसेही आहेत की? बॉलिवूड आणि राजकारणातील माणसांच्या गॉसीफवर नेहमीच चर्वितचरण होत असते. विषेशत: नेत्यांच्या लपड्याची किंवा त्यांच्या प्रेमप्रकरणावर गल्लीबोळात रंगवून गोष्टी सांगितल्या जातात. नेत्यांचे विवाहबाह्य संबंध जेव्हा पुढे येतात. बलात्काराचे आरोप होतात तेव्हा प्रसारमाध्यमांना तर खाद्यच मिळते. वास्तवात हे आरोप किती खरे आणि किती खोटे हे कोणीही तातडीने सिद्ध करू शकत नाही. मात्र इतके नक्की की आरोपाने एखाद्याचे आयुष्य उद्धवस्तही होऊ शकते. हे शंभर टक्के बरोबर असले तरी आरोप होतातच कसे ? आरोप करणाऱ्या व्यक्ती जाहीररित्या जर खळबळजनक आरोप करीत असतील तर त्यामध्ये काहीतरी तथ्य असायला पाहिजे अशी भावना समाजमनात निर्माण होते. एकदा डाग लागला की तो मरेपर्यंत कोणत्याही लिक्विडने पुसला जात नाही.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांचं एकमेकांवर प्रेम होतं, हे दोघंही एकमेकांचा आदरही करत होते, मात्र त्यांच्यात कोणत्याही प्रकारे शारिरीक संबंध कधीच आले नाहीत असा खुलासा एडविना माऊंटबॅटन यांची मुलगी पामेला हिक्‍स यांनी केला आहे. "डॉटर ऑफ एंपायर : लाइफ ऍज ए माउंटबॅटन' या त्यांच्या पुस्तकात त्यांनी हा खुलासा केला आहे. पंडित नेहरू यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा देशभर पुन्हा सुरू असतानाच इकडे महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेच्या मंत्रिमंडळातील एक धडाकेबाज शेतकऱ्यांचा नेता आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर त्यांच्याच सांगली जिल्ह्यातील एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. काही दिवसापूर्वी कॉंग्रेसचे रोहित टिळक यांच्यावरही असाच आरोप करण्यात आला. खोत आणि टिळक हे दोघेही सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात झालेल्या गंभीर आरोपाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. अन्यथा एखाद्या सामान्य माणसावर असे आरोप झाले असते तर माध्यमांनी त्याची इतकी दखलही घेतली नसती. शेवटी बलात्काराचा आरोप झाल्याने कानोकानी चर्चा होणार. त्यातच मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तिवर असे आरोप झाल्यास विरोधक अधिकच आक्रमक होतात आणि त्याच्या राजीनाम्याची मागणी करतात. ही मागणी जोरकसपणे लावून धरली जाते. तेच सध्या सदाभाऊंबाबत होत आहे.

ज्या महिलेने त्यांच्याविरोधात आरोप केले आहेत त्याची सत्यासत्यता यथाअवकाश बाहेर येईल. काहीवेळेला थेट आरोप होतात. मात्र पोलिसात तक्रार नसते. त्यामुळे पोलिस यंत्रनेचीही कसोटी लागते. जी व्यक्ति आरोप करते त्याचा जवाब किंवा जी म्हणून काही प्रक्रिया आहे ती सुरू होते. पुढे काही दिवस लोटतात आणि नेमके काय होते हे कळत नाही. प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर कोणी त्यावर भाष्यही करीत नाही असे साधारणपणे होत असते. प्रत्येक वेळी नेत्यांविरोधात झालेले आरोप हे खरेच असतील असेही नाही आणि ते खोटेही असतात असे समजण्याचे कारण नाही. काहीवेळा राजकारण इतक्‍या खालच्यापातळीवर खेळले जाते की एखादा नेता आयुष्यातून उठू शकतो. नैतिक जबाबदारी स्वीकारून काहीवेळा तडाफडकी राजीनामा देणारे नेतेही होऊन गेले. कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात कोणाला डोकाविण्याचाही अधिकार नाही. हे सर्व खरे असले तरी तुम्ही सार्वजनिक जीवनात असल्याने तुम्हाला अग्नीपरिक्षेला सामोरे हे जावेच लाग. "एकवेळ मारणाऱ्याचे हात आपण धरू शकतो पण, बोलणाऱ्याचे तोंड धरू शकत नाही' असे बोलले जाते हे खरे आहे. परंतू थेट बलात्काराचा आरोप होत असेल तर ती बाब निश्‍चितपणे गंभीरच आहे. सदाभाऊंवर ज्या महिलेने आरोप केले आहेत त्याच महिलेने यापूर्वी सांगली जिल्ह्यातीलच मनसेच्या एका नेत्यावर असेच आरोप केले होते. या आरोपानंतर तत्कालिन गृहमंत्री आर आर पाटील यांनी बलात्कार करायचा तर तो निवडणुकीनंतर तरी करायचा असे वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. आबांवर सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी हे आपले विधान मागे घेतानाच दिलगिरीही व्यक्त केली होती.

सदाभाऊंवर झालेल्या या गंभीर आरोपाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशी दखल घेतात हे पाहावे लागेल. सदाभाऊंनाही आपले निरपराधित्व सिद्ध करावे लागेल. राजकारणातील व्यक्तिंवर असे आरोप होणे हे काही नवे नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. अनैतिक संबंधातून राजस्थानमधील एका कॉंग्रेस मंत्र्याने एका नर्सची कशी हत्या केली होती हे प्रकरणही देशभर गाजले. या मंत्र्यामुळे कॉंग्रेसची अब्रुही वेशीला टांगली होती हे सांगायलाच नको. 

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही बरखाप्रकरणी अनैतिक संबंधाचे आरोप झाले. त्यावेळी मुंडे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. मुंडे यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यावर थेट असे आरोप झाल्याने या पक्षालाही धक्का बसला होता. मुंडे यांच्यावर प्रखर टीका होऊ लागल्यानंतर त्यांच्या मदतीला धावले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. मुंडेंच्या उपस्थितीत शिवाजीपार्कवर झालेल्या जाहीरसभेत टीकाकारांचा आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला होता. तर दुसरीकडे मुंडेजी प्यार किया तो डरना क्‍या ! असा सल्ला देऊन वादाला फोडणी घातली. बाळासाहेबांचे मत होते की नेत्यांनी प्रेम करू नये असे कुठे लिहिले आहे. मात्र सार्वजनिक जीवनात जी म्हणून काही पथ्ये पाळली जात आहेत त्यावरच प्रश्‍न विचारले जावू लागले. आज मुंडे हयात नाहीत पण, त्यांच्यावर झालेल्या आरोपाची चर्चा मात्र त्यांच्या पश्‍चातही होत आहे. 

बॉलिवूडप्रमाणे राजकारणालाही ग्लॅमर आहे. सत्ता, संपत्ती, थाट, अलिशान गाड्या, कार्यकर्त्यांची फौज हे सर्वच आले. नेत्यांना भेटणारे तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. तरीही आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न हा करायला हवा. कुठे, कधी आणि कोणाला भेटायचे? याची दक्षता घ्यायलाच हवी. आजचे जग हे तंत्रज्ञानाचे. तुम्ही काहीही बोलला तरी ते रेकॉडींग होते. तो पुरावा असतो. आपली फसगत होईल हे ही का लक्षात घेतले जात नाही. 

एखाद्या नेत्यावर जेव्हा आरोप होतो. त्याच्या कुटुंबाचे काय होत असेल ? त्याची पत्नी, मुले मुली यांना काय वाटत असेल? आपला बाप खरच असा आहे का ? ही शंका मनात क्षणभर का होईना येऊन जात असेल का ? हे आणि असे कितीतरी प्रश्‍न पुढे येतात. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळणे मात्र अवघड आहे. 

दुसरीकडे अशी अनेक नावे घेता येतील की जे आयुष्यभर सार्वजनिक जीवनात वावरली मात्र त्यांच्यावर कधीही असले आरोप झाले नाहीत. आज जे विद्यमान नेते आहेत त्यामध्ये काही नावे घेता येतील. त्यामध्ये शरद पवार, राम नाईक, राम कापसे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींचा उल्लेख करावा लागेल. या सर्व मंडळींवर कदाचित राजकीय आरोप झाले असतील. मात्र त्यांच्या चारित्र्यावर कोणाचीही शिंतोडे उडविण्याची हिम्मत झाली नाही. आपल्यावर कदापी शिंतोडे उडणार नाहीत याची काळजी प्रत्येक नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनीही घ्यायला हवी. अन्यथा जेथे धूर आहे तेथे आग असणारच असे कोणी म्हणू शकतो.

Web Title: Prakash Patil writes about political leaders and allegations