मुख्यमंत्र्यांना पोलिसांनीच हेलिकॉप्टरच्या बाहेर काढले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

लातूर - निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला गुरुवारी (ता. 25) झालेल्या अपघातानंतर त्यांना नेमके कोणी बाहेर काढले, याची अपघातानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे; पण पोलिसांनीच त्यांना हेलिकॉप्टरच्या बाहेर काढल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फडणवीस यांना पोलिसांनीच बाहेर काढल्याची माहिती जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आज देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात एकालाच "हिरो'; तर पोलिसांना "झिरो' करण्याचा प्रयत्न फसला आहे.

निलंगा येथील हेलिकॉप्टरच्या अपघातातून फडणवीस यांच्यासह सहा जण सुखरूप बचावले. या अपघातानंतर फडणवीस यांना नेमके कोणी बाहेर काढले, यावर चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळल्यानंतर हेलिपॅडवरच असलेले पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजनकर; तसेच बंदोबस्तास असलेले साध्या वेशातील व गणवेशातील स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि "एसपीयू'चे अधिकारी व कर्मचारी तत्काळ हेलिकॉप्टरकडे धावले. त्यांनी फडणवीस व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींना हेलिकॉप्टरमधून बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले, अशी माहिती पोलिस दलाकडून देण्यात आली.