डोंबिवलीत कामगाराला आले 62 हजार रुपये वीजबिल

संजीत वायंगणकर
शुक्रवार, 23 जून 2017

शहरातील वीजग्राहकांना गेल्या महिन्यापासून नाहक वाढीव देयके देऊन मीटर तपासणीची सक्ती करुन अतिरिक्त पैशांचा भुर्दंड आकारण्यात येत आहे. डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या राजू शिर्के या नाका कामगाराला गेल्या महिन्याचे वीज देयक तब्बल 62 हजार 500रुपये पाठविण्यात आले.

डोंबिवली - शहरातील वीजग्राहकांना गेल्या महिन्यापासून नाहक वाढीव देयके देऊन मीटर तपासणीची सक्ती करुन अतिरिक्त पैशांचा भुर्दंड आकारण्यात येत आहे. डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या राजू शिर्के या नाका कामगाराला गेल्या महिन्याचे वीज देयक तब्बल 62 हजार 500रुपये पाठविण्यात आले.

"इतके देयक कसे भरणार?' असा प्रश्न पडल्याने शिर्के यांनी भाजपाकडे आपली व्यथा मांडली. यावर भाजपा नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयात धडक देऊन कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांचा जाब विचारला. इलेक्‍ट्रॉनिक मीटर सदोष असल्याने वाढीव देयके येत असल्याचे यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने सांगितले. तर या मीटरची तपासणी करण्यात येईल, असे उत्तर बिक्कड यांनी दिले. डोंबिवलीत काही महिन्यापासून वाढीव देयके पाठविण्यात येत असल्याने नागरिक प्रचंड वैतागले आहेत. अशा नागरिकांना "आधी वीज बिल भरा, नंतर तुमचे म्हणणे ऐकतो' अशी उत्तरे महावितरणच्या कार्यालयात मिळत असतात.

कार्यालयात वीजग्राहकांना उद्धटपणे उत्तर देणे, वाढीव वीज बिले देणे अशा प्रकरच्या तक्रारी भाजपकडे आल्याने शुक्रवारी भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक महेश पाटील, जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, नगरसेविका डॉ. सुनिता पाटील यांच्यासह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. सर्वसामान्य ग्राहकांना अव्वाच्या सव्वा देयके आल्याने सत्ताधारी नगरसेवक "आपलेच दात व आपलेच ओठ' अशा कात्रीत सापडले आहेत. महेश पाटील यांनी कार्यकारी अभियंता बिक्कड यांना धारेवर धरत अशा चुका टाळण्याचे सांगितले व सर्व सदोष मीटर महावितरणने तात्काळ विनामूल्य बदलावीत अशी मागणी केली. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असतानाही नागरिकांवर अन्याय होत असून भाजपा शांत का असा प्रश्न नागरिक विचारत असून आता जोवर नागरिकांना योग्य वीज बिल मिळत नाही, तोपर्यत महावितरण कंपनीच्या कार्यालयात भाजपा जाब विचारण्यासाठी येणार असा इशारा देत आम्ही आता हात जोडून नागरिकांचे म्हणणे आपल्या समोर मांडत आहोत, यापुढे जर असे प्रकार सुरु राहिले तर भाजपला आक्रमक व्हावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला.