तब्बल 21 वर्षांनंतर खटल्याची सुनावणी! 

सुनीता महामुणकर
रविवार, 17 सप्टेंबर 2017

मुंबई : मोटारीतील स्टिरिओची चोरी केल्याच्या प्रकरणात खटल्याची तारीखच न पडल्यामुळे 21 वर्षांपूर्वी विद्यार्थी असताना गुदरलेला खटला आता आरोपी परदेशात स्थायिक झाल्यावर सुनावणीसाठी आला आहे. या विलंबाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून, खटला रद्दबातल ठरवला आहे. 

मुंबई : मोटारीतील स्टिरिओची चोरी केल्याच्या प्रकरणात खटल्याची तारीखच न पडल्यामुळे 21 वर्षांपूर्वी विद्यार्थी असताना गुदरलेला खटला आता आरोपी परदेशात स्थायिक झाल्यावर सुनावणीसाठी आला आहे. या विलंबाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून, खटला रद्दबातल ठरवला आहे. 

शालेय विद्यार्थी असताना फेब्रुवारी 1996 मध्ये मोटारीतील स्टिरिओ चोरल्याचा आरोप याचिकादारावर करण्यात आला होता. गाडीची काच फोडून त्याने आणि अन्य एका मुलाने ही चोरी केली, अशी तक्रार मेघवाडी पोलिसांनी नोंदवली होती; मात्र या तक्रारीची फौजदारी कारवाई सुरू झाली नाही. दरम्यानच्या काळात याचिकादाराने शिक्षण पूर्ण केले आणि तो नोकरीसाठी परदेशात गेला. तो तिथेच स्थायिक झाला. त्याच्याकडे आणि त्याच्या पत्नीकडे संलग्न पासपोर्ट आहे.

2016मध्ये पत्नीने व्हिसासाठी अर्ज केला होता; मात्र पतीविरोधात गुन्हा दाखल असल्यामुळे व्हिसा नाकारण्यात आला. याबाबत चौकशी केल्यावर 21 वर्षांपूर्वीचे हे प्रकरण उघड झाले. संबंधित खटला दंडाधिकारी न्यायालयातून रेल्वेच्या फिरत्या न्यायालयाकडे सोपवण्यात आला आहे, अशी माहिती त्यांना पोलिसांकडून मिळाली; मात्र तक्रारीबाबत अन्य तपशील मिळाला नाही. 

एवढ्या वर्षांत पोलिसांकडून या प्रकरणाबाबत कारवाई सुरू करण्यात आली नाही; तसेच तक्रारीची कागदपत्रेही पोलिस ठाण्यात आणि दंडाधिकारी न्यायालयात उपलब्ध नाहीत. चोरीला गेलेला स्टरिओही मिळालेला नाही. तक्रारदार आणि साक्षीदारही पोलिसांकडे हजर नाहीत, अशा परिस्थितीत संबंधित तक्रार रद्द करावी, अशी मागणी आरोपीने याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली होती.

न्या. आर. एम. सावंत आणि न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने या संपूर्ण प्रकाराबाबत आणि खटल्याला लागलेल्या प्रदीर्घ कालावधीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा फटका याचिकादाराला बसला आणि वेळेत न्याय मिळण्याच्या त्याच्या अधिकारातही यामुळे बाधा आली, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. त्याच्याविरोधात दाखल केलेली फौजदारी तक्रारही न्यायालयाने रद्द केली.