राणेंना काँग्रेसचा दणका 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 17 सप्टेंबर 2017

मुंबई : काँग्रेसला 'जय महाराष्ट्र' करण्याच्या प्रयत्नात असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेसने आज अनपेक्षित दणका दिला. राणे यांच्या वर्चस्वाखालील सिंधुदूर्ग जिल्हा कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करत काँग्रेसने राणे यांच्यावरील राजकीय कारवाईला तोंड फोडले आहे. राणेसमर्थक जिल्हाध्यक्षांना हटवत त्यांच्या जागी विकास सावंत यांची निवड करण्यात आली आहे. 

मागील काही महिन्यांपासून राणे काँग्रेसमध्ये नाराज असून, लवकरच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबतही त्यांची गुजरातमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटदेखील घडवून आणली होती. काँग्रेस सोडून राणे भाजपमध्ये प्रवेशकरते होण्याअगोदरच काँग्रेसने कारवाई केली आहे. 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे प्रदेश सरचिटणीस ऍड. गणेश पाटील यांनी जाहीर केले. सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हा अध्यक्ष व कार्यकारिणीप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत.

पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. ते राज्याचे माजी मंत्री भालचंद्र ऊर्फ भाई सावंत यांचे चिरंजीव असून, गेल्या अनेक वर्षांपासून पक्षसंघटनेचे काम पाहत आहेत.