"बीएमसीवर भरोसा'वरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 जुलै 2017

मुंबई - "मुंबई, तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?' या आरजे मलिष्काच्या गाण्यावरून मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला असताना इतर राजकीय पक्षांनीही हात धुवून घेण्याची संधी साधली आहे. 

आरजे मलिष्काने या गाण्याच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचे शिवसेनेचे मत आहे. यामुळे मुंबईची बेअब्रू झाल्याने मलिष्काच्या विरोधात पाचशे कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. याबाबत या दोन नगरसेवकांनी महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांची भेट घेतली; तसेच मलिष्काचे गाणे खोडून काढणारे गाणे सोशल मीडियावर प्रसारित केले. 

दरम्यान, महापलिका अधिकाऱ्यांनी मलिष्काच्या घराची तपासणी करून डेंगी रोगाचा प्रसार करणारे डास सापडल्यावरून नोटीस पाठवली आहे. शिवसेनेने मलिष्काचे गाणे गंभीरपणे घेतले आहे. शिवसेनेच्या या भूमिकेची खिल्ली उडवताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षरीत्या टीका करणारे ट्‌विट केले आहे. त्यात शेलार यांनी म्हटले आहे की, मुंबईकरांना रोज ज्या गंभीर विषयांवर "सामना' करावा लागतो त्यावर व्यंग्यात्मक "मार्मिक' टीका मलिष्का यांनी केली. त्यांना अभिव्यक्‍ती स्वातंत्र आहे. या ट्‌विटमध्ये सामना, मार्मिक या दोन शब्दांचा शेलार यांनी उपयोग केला आहे. 

कॉंग्रेसचे नितेश राणे यांनी मलिष्काला पाठिंबा दिला आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी मलिष्काच्या गाण्याचा संदर्भ देत "शिवसेनेचा पोलखोल' केला आहे, असे म्हटले आहे. याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष अमोल जाधवराव यांनी मलिष्काला पाठिंबा दिला आहे. मलिष्काने जर सर्वसामान्यांचा प्रश्‍न गाण्यातून मांडला असेल तर त्यात दोष कोणाचा? असा सवाल केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मलिष्काच्या या गीतावरून सर्वपक्षीय राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार असल्याची शक्‍यता आहे.