शिवाजीराव पाटील यांचे निधन

शिवाजीराव पाटील यांचे निधन

मुंबई - माजी मंत्री व शिरपूर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण शिवाजीराव गिरधर पाटील (वय 92) यांचे शनिवारी पहाटे मुंबई येथील लीलावती रुग्णालयामध्ये निधन झाले. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे ते वडील होत. ते शिरपूर (जि. धुळे) येथे राहत होते. 

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. शुक्रवारी (ता. 21) रात्री उशिरा त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागले. आज पहाटे चारला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे अनिता देशमुख व गीता पाटील या दोन मुली, नातू अभिनेता प्रतीक बब्बर असा परिवार आहे. 
शिवाजीराव पाटील यांचा जन्म डांगरी (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. ज्येष्ठ बंधू उत्तमराव पाटील, वहिनी लीलाताई पाटील यांच्यासह विविध क्रांतिकार्यात ते सहभागी झाले. त्यांनी तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाने ते कॉंग्रेसमध्ये गेले. शिरपूर तालुक्‍याचे दोनदा आमदार, वीज, पाटबंधारे व राजशिष्टाचार राज्यमंत्री, सहकारमंत्री, राज्यसभा सदस्य, अशी विविध पदे त्यांनी भूषवली. 

सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. 1982 मध्ये शिरपूर साखर कारखान्याची स्थापना त्यांनी केली. जागतिक ऊस व बीट साखर उत्पादक महासंघाचे अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय सल्लागार म्हणून ते ओळखले जात. पद्मभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या पत्नी विद्याताई पाटील यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. 

शिवाजीराव पाटील यांच्यावर सोमवारी (ता. 24) सकाळी 11 वाजता शिरपूर येथील स्मिता पाटील पब्लिक स्कूलच्या आवारात अंत्यसंस्कार होतील.

12 वर्षे मंत्रिपद भूषविलेले शिवाजीराव पाटील 1960 ते 1967 या काळात विधान परिषदेचे सदस्य होते. 1967 ते 1980 या काळात ते विधानसभेवर निवडून गेले. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खाती सांभाळली. 1992 ते 1998 या काळात ते राज्यसभेवरही गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com