स्वाईन फ्लूचे शहरात ५४ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

नवी मुंबई - ठाणे जिल्ह्यात जानेवारीपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्वाईन फ्लूचे २५० हून अधिक रुग्ण सापडले. १२ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईतही हळूहळू स्वाईन फ्लूची लागण होत असून, एकाचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले आहे, तर आतापर्यंत ५४ रुग्ण सापडले आहेत.

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. सध्या शहरात तापाची जोरदार साथ सुरू असून, पालिकेच्या रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालयातही तापाचे रुग्ण आहेत. शहरात स्वाईनची लागण झालेले ५४ रुग्ण सापडले आहेत. त्यात सर्वाधिक ११ रुग्ण करावे गावातील आहेत. त्याखालोखाल सीबीडी व नेरूळ विभागात प्रत्येकी सात, नेरूळ व जुहू गावामध्ये प्रत्येकी सहा, सानपाड्यात चार, ऐरोलीत तीन, शिरवणे, पावणे आणि घणसोलीत प्रत्येकी दोन, कातकरी पाडा, रबाळे आणि कोपरखैरणेत प्रत्येकी एक रुग्ण सापडला. त्यापैकी एका रुग्णाचा नेरूळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत रुग्ण हा ट्रकचालक होता. त्यामुळे त्याला स्वाईनची बाधा कोठे झाली, याचा अंदाज मांडणे मुश्‍कील असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

उत्सवाच्या काळात पालिकेसमोर आव्हान
या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने स्वाईनवर नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या असून, जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जात आहेत; मात्र गोपाळकाल्यासह गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवादरम्यान नियंत्रण ठेवण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान असेल.