कोपर्डीत 'निर्भया'चा पुतळा बसविला आणि झाकलाही 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

"ती नजरेसमोर कायम राहणार म्हणून...' 
निर्भया'ची आई म्हणाली, ""मुलीची आठवण कायमस्वरूपी जतन करण्यासाठी पुतळा उभारला. आता तो झाकला आहे. पुतळा, समाधी की स्मारक, याबाबत कुणीही राजकारण करू नये. आम्ही आमच्या मालकीच्या जागेत तिचे स्मरण म्हणून पुतळा उभारला. यात कोणाचाही हस्तक्षेप नाही. त्यामुळे ती आमच्या नजरेसमोर कायम राहणार होती. त्यातून कोणत्याही आक्षेपार्ह घटनेचे उदात्तीकरण अथवा भावना दुखावण्याचा हेतू नाही.

कोपर्डी (ता. कर्जत) : अत्याचाराची बळी ठरलेल्या "निर्भया'च्या घरासमोर बांधलेल्या स्मृतिस्थळावर पहिल्या स्मृतिदिनी काल (गुरुवारी) रात्री उशिरा कुटुंबीयांनी प्रतीकात्मक पुतळा बसविला. गावकऱ्यांच्या विरोधामुळे तो आज सकाळी झाकून ठेवण्यात आला. समाधीलाही विरोध होत असेल तर आम्ही तेथे मंदिर उभारू असे मत तिच्या आईने व्यक्त केले. सध्या कोपर्डीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

याबाबत माहिती अशी : अत्याचार आणि खून झालेल्या "निर्भया'चा गुरुवारी पहिला स्मृतिदिन होता. त्यानिमित्त राज्यभरातून आलेल्या अनेकांनी तिला श्रद्धांजली वाहिली. तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तेथे भैयूजी महाराज यांच्या सूर्योदय संस्थेतर्फे स्मारक उभारले जात आहे. तेथेच काल तिचा प्रतीकात्मक पुतळा बसविण्याचे नियोजन होते. संभाजी ब्रिगेडसह गावकऱ्यांनीही विरोध केल्याने कार्यक्रम स्थगित करण्यात आला. 
दरम्यान, श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले लोक परतल्यानंतर काल रात्री नियोजित स्मारकातील चबुतऱ्यावर "निर्भया'च्या आईच्या हस्ते पुतळा बसविण्यात आला. हे सकाळी समजल्यानंतर गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्यातर्फे ज्येष्ठ नेते लालासाहेब सुद्रिक यांनी मुलीच्या वडिलांशी चर्चा केली. त्यानंतर पीडित मुलीच्या भाऊ-बहिणीने पुतळा पांढऱ्या कापडाने झाकून ठेवला.

सुद्रिक म्हणाले, "पुतळा किंवा स्मारक याला गावकऱ्यांचा विरोध आहे; मात्र याचे कोणी राजकारण करू नये. "निर्भया'चे कुटुंबीय आणि गावकरी एकत्र बसून याबाबत तोडगा काढतील. तूर्त पुतळा झाकला आहे. त्यामुळे चर्चेला येथेच पूर्णविराम मिळावा.'' 
दरम्यान, पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी आज येथे येऊन पाहणी केली. बंदोबस्ताबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. 

"ती नजरेसमोर कायम राहणार म्हणून...' 
निर्भया'ची आई म्हणाली, ""मुलीची आठवण कायमस्वरूपी जतन करण्यासाठी पुतळा उभारला. आता तो झाकला आहे. पुतळा, समाधी की स्मारक, याबाबत कुणीही राजकारण करू नये. आम्ही आमच्या मालकीच्या जागेत तिचे स्मरण म्हणून पुतळा उभारला. यात कोणाचाही हस्तक्षेप नाही. त्यामुळे ती आमच्या नजरेसमोर कायम राहणार होती. त्यातून कोणत्याही आक्षेपार्ह घटनेचे उदात्तीकरण अथवा भावना दुखावण्याचा हेतू नाही. जिच्या बलिदानाने सर्व मराठा समाज एकवटला, तिची आठवण म्हणून काही तरी स्थळ असावे, एवढीच आमची इच्छा आहे.'' 

संभाजी ब्रिगेडचा पुतळ्याला विरोध 
नगर - कोपर्डी येथे निर्भयाचे स्मारक करून पुतळा उभारण्यास संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. त्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांना आज निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की "पीडित मुलीचे स्मारक भैयूजी महाराजांकडून उभारण्यात येत आहे. स्मारक पराक्रमाचे व शौर्याचे प्रतीक असते. कोपर्डीच्या बहिणीवर अमानुष अत्याचार झाला, त्यामुळे तिचे स्मारक उभे करू नये. त्यातून प्रेरणा मिळण्याऐवजी भविष्यात सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते, तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पीडितेचे छायाचित्र आणि नाव गोपनीय ठेवले जाते. त्यामागे पीडितेचा अवमान होऊ नये ही भावना असते. यामुळे पीडितेचा पुतळा करू नये.' निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष गोरख दळवी, माजी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, जिल्हा सचिव टिळक भोस, अवधूत पवार आदी उपस्थित होते.