अठरापगड जातींसोबत रंगतो भवानीचा नवरात्र सोहळा

सुधाकर काशीद
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  नवरात्र म्हणजे नवरंगांचा सोहळा आहे. नवदुर्गांचा सन्मान आहे. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलच आहे; पण भवानी मंडपातील भवानीचा नवरात्र सोहळा म्हणजे धर्म, जात, पंथ, गरीब, श्रीमंत या भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला एक सोहळा ठरला आहे. शिवरायांची सून महाराणी ताराराणी यांनी स्थापन केलेल्या करवीर संस्थानची बांधणीच कशी अठरापगड जातींना बरोबर घेऊन जाणारी होती, याची जणू साक्षच देणारा हा सोहळा आहे.

कोल्हापूर -  नवरात्र म्हणजे नवरंगांचा सोहळा आहे. नवदुर्गांचा सन्मान आहे. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलच आहे; पण भवानी मंडपातील भवानीचा नवरात्र सोहळा म्हणजे धर्म, जात, पंथ, गरीब, श्रीमंत या भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला एक सोहळा ठरला आहे. शिवरायांची सून महाराणी ताराराणी यांनी स्थापन केलेल्या करवीर संस्थानची बांधणीच कशी अठरापगड जातींना बरोबर घेऊन जाणारी होती, याची जणू साक्षच देणारा हा सोहळा आहे.

आज नवरात्र म्हणजे लखलखाट, झगमगाट, दांडिया, सोन्या-चांदीचे ऐश्‍वर्य असे स्वरूप झाले; पण त्यातही भवानीच्या नवरात्र सोहळ्याने आपले पारंपरिक तेज जपले आहे. गुरुवारी सकाळी भवानी मंडपात गायकवाड घराण्यातील ज्येष्ठांकडून प्रथेप्रमाणे घटस्थापनेचा विधी झाला व भवानीची पालखी पहिल्या दिवशी अंबाबाई मंदिरात गेली आणि देवधर्म माणसांना तोडत नाही, तर कसा जोडत जातो, याची प्रचीती येण्यास सुरवात झाली.

आता नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ही पालखी पंचगंगा नदीच्या घाटावरील पूर्वजांच्या समाधिस्थळाला जाणार आहे. आपल्या पूर्वजांची आवर्जून आठवण ठेवण्याची ही परंपरा आहे. तिसऱ्या दिवशी पालखी खोलखंडोबा मंदिराला जाते; पण जाताना बारा बलुतेदारांच्या वस्तीतूनच जाणीवपूर्वक नेली जाते. काळा इमाम तालीम, बुरूड गल्ली, डांगे गल्ली, तोरस्कर चौक, बुधवार पेठ, सोन्या-मारुती चौक याच पारंपरिक मार्गाने जाते. चौथ्या दिवशी पालखी बिंदू चौकातून एकवीरा देवीला व पाचव्या दिवशी त्र्यंबोलीला जाते. सहाव्या दिवशी मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, राम गल्ली, तुरबत, सुबराव गवळी तालीम ते पद्मावती मंदिरात जाते. जाताना आवर्जून माळी गल्लीतील विठ्ठल मंदिरात थांबते. 

सातव्या दिवशी विठ्ठल, रंकोबाला व आठव्या दिवशी दैवज्ञ बोर्डिंग, खरी कॉर्नर, गांधी मैदान, निवृत्ती चौक, उभा मारुती, महाकाली, रंकाळा, धुण्याची चावी, अनुकामिनी, दुधाळी, उत्तरेश्‍वर, गोंधळी गल्ली, तेली गल्ली, जोशी गल्ली, मणेर मशीद, खाटीक मंडई, कसाब मशीद या मार्गानेच जाते. या सर्व मार्गावर बहुजन समाज व बारा-बलुतेदारांची वस्ती आहे. देवच त्यांच्या दारातून पालखीतून येतो, असे या सोहळ्याचे स्वरूप आहे. 

उच्च-नीच, गरीब-श्रीमंत भेद नाही
विशेष हे, की देवीचा गाभारा स्वच्छ करण्याचे काम दलित कुटुंबाकडे आहे. याच कुटुंबाला पालखीची, देवीची व महाराजांची दृष्ट काढायचा मान आहे. पालखी उचलण्याचा मान भोई समाजाला आहे. पालखीपुढे वाजंत्री वाजवण्याचा मान होलार समाजाला, देवीच्या समोर आरशाने उन्हाची किरणे पाडण्याचा मान न्हावी समाजाला, देवीसमोर बळी देण्यासाठी बकरी पुरवण्याचा मान घोटणे कुटुंबाला, बकऱ्यांचे मुंडके उडवण्याचा मान गायकवाड कुटुंबाला व पालखीपुढे चोपदाराचा मान बोंद्रे कुटुंबाला आहे. रामजी, शंकर, संभाजी व उदय अशी चौथी पिढी चोपदाराचे काम करते. नऊ दिवस चालणारा हा पालखी सोहळा धार्मिक आहे; पण या धार्मिक सोहळ्यात सर्व जातीधर्मांना सामावून घेतले आहे. उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असला भेद या सोहळ्याच्या आसपासही फिरकत नाही.

Web Title: kolhapur news bhavani navratra festival