पंचगंगेचा "पिकनिक पॉईंट' हाऊसफुल्ल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

कोल्हापूर - पावसाने उघडीप दिल्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही पंचगंगा नदीवरील पिकनिक पॉईंट हाऊसफुल्ल झाला. पंचगंगा नदीला आलेल्या पुराची परिस्थिती उंचावरून पाहण्यासाठी हा एकमेव पॉईंट असल्यामुळे तेथे सकाळपासून गर्दी होती. अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. 

कोल्हापूर - पावसाने उघडीप दिल्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही पंचगंगा नदीवरील पिकनिक पॉईंट हाऊसफुल्ल झाला. पंचगंगा नदीला आलेल्या पुराची परिस्थिती उंचावरून पाहण्यासाठी हा एकमेव पॉईंट असल्यामुळे तेथे सकाळपासून गर्दी होती. अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. 

गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी धोका पातळीकडे झुकली आहे. शिवाजी पुलावरून 2-3 चाकी वाहनांना प्रवेश आहे. काल दिवसभर पुलावर थांबून नागरिकांनी पंचगंगा नदी पात्रातील पाणी पाहण्याचा आनंद घेतला, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आजपासून कोणालाही पुलावर थांबता येणार नाही, अशा सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे आज दिवसभर पुलावरून केवळ ये-जा करणारी वाहतूकच दिसून आली. पर्यायाने नागरिकांनी दुपारी चार ते रात्री आठपर्यंत पिकनिक पॉईंटवर गर्दी होती. नदीचे भरलेले पात्र उंचावरून पाहण्याचा आनंद सहकुटुंब घेत होते. पिकनिक पॉईंटवर असलेल्या ओपन जिमचाही आनंद अनेक महिलांनी, मुलांनी घेतला. खाद्यपदार्थांची रेलचेलमधून वाट काढतच नागरिकांनी पिकनिक पॉईंटपर्यंत पोचावे लागले. अनेकांनी हातात खाद्यपदार्थ घेऊनच पंचगंगा नदी परिसरात फेरफटका मारण्याचा आनंद घेतला. 

कै. संजय गायकवाड पुतळ्याजवळही पाणी आल्यामुळे गंगावेस-शिवाजी पूल हा मार्ग वाहतुकीस बंद आहे, मात्र पुतळ्याजवळ उभे राहून नदीचे पात्र पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. म्हशी, गाड्या धुणाऱ्यांची ही संख्या अधिक होती. शिवाजी पुलाजवळील स्मशानघाटाजवळून नदी पात्र पाहण्यासाठी अनेक तरुण थांबून होते. शिवाजी पुलावर असलेल्या पोलिसांनी पाणी पाहण्यासाठी आलेल्या कोणालाही काहीच त्रास होणार नाही याचीही काळजी पोलिस घेत होते, मात्र अनेक चारचाकी तेथेच थांबून पुढे जाण्याचा आग्रह धरत होते. काहीवेळा त्यांनी पोलिसांशी हुज्जतही घातली. एकदंरीत पूरस्थितीचे पाणी पाहण्यातच आज अनेकांनी संडे सेलिब्रेशन केले.