खुनाची बतावणी करून महिलेचे दागिने पळविले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - खून झाल्याची बतावणी करून महिलेचे साडेसहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने दोघा मोटारसायकलस्वार चोरट्यांनी लंपास केले. आपटेनगर परिसरात काल (मंगळवारी) काल सायंकाळी हा प्रकार घडला. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली. याबाबतची फिर्याद संध्या साताप्पा चौगुले (वय ४२, रा. नामस्मरण कॉलनी, राधानगरी रोड) यांनी दिली.

कोल्हापूर - खून झाल्याची बतावणी करून महिलेचे साडेसहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने दोघा मोटारसायकलस्वार चोरट्यांनी लंपास केले. आपटेनगर परिसरात काल (मंगळवारी) काल सायंकाळी हा प्रकार घडला. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली. याबाबतची फिर्याद संध्या साताप्पा चौगुले (वय ४२, रा. नामस्मरण कॉलनी, राधानगरी रोड) यांनी दिली.

संध्या चौगुले राधानगरी रोडवरील नामस्मरण कॉलनीत राहतात. काल त्या माहेरी गेल्या होत्या. सायंकाळी त्या माहेरहून घरी पायी जात होत्या. आपटेनगर परिसरात काळ्या मोटारसायकलवरून दोघे तरुण त्यांच्यासमोर आले. ‘पुढे याच रस्त्यावर काल एकाचा खून झाला आहे. तपासणीसाठी साहेब पुढे उभे आहेत. तुमचीही त्यांच्याकडून चौकशी केली जाईल. तुम्ही दागिने घालून पुढे जाऊ नका. ते काढून पिशवीत ठेवा’, असे सांगितले.

त्यावर विश्‍वास ठेवून चौगुले यांनी साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे बिलवर काढून पिशवीत ठेवण्याचा प्रयत्न केला. तीच संधी साधून त्या दोघांनी हिसडा मारून त्यांच्या हातातील दागिने लंपास केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चौगुले यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरील नागरिक जमा झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत चोरटे धूम स्टाईलने पसार झाले. रात्री चौगुले यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार १ लाख ३० हजार रुपये चोरीची नोंद पोलिस ठाण्यात झाली. 

कधी पोलिस, कधी खून..
दरम्यान, प्रतिभानगर परिसरात पोलिस असल्याची बतावणी करून एका वृद्धेचे सहा तोळ्यांचे दागिने दोघांनी लुबाडले. तर आपटेनगर परिसरात झालेल्या घटनेची पोलिसांत नोंद झाली. आपटेनगरमध्ये सीसीटीव्हीचा अभाव असल्याने चोरट्यांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. दररोज घडणाऱ्या घटनांमुळे महिलांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण लंपास
इचलकरंजी : पत्ता विचारण्याचा बहाणा करून महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे गंठण मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यानी धुम स्टाईने लंपास केले. ही घटना येथील सांगली नाका परिसरातील मधूबन हौसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. यांची नोंद पोलिसांत झाली आहे. 

ललीता आप्पासाहेब मेंडिगिरी (रा.मधूबन हौसिंग सोसायटी, सांगली नाका) मैत्रिणीसह चालत घराकडे येत होत्या. त्यांच्या शेजारी मोटरसायकलवरून दोन तरूण आले. पैकी एकाने त्यांच्याकडे पत्ता विचारण्याचा बहाणा करून मेंडिगिरी यांच्या गळ्यातील पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसडा मारून घेवून पोबारा केला. याबाबत येथील गावभाग पोलिसात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने चोरट्याचा शोध सुरू केला आहे.