संगमनेर: २५० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त; वाळू तस्करांमध्ये खळबळ 

हरिभाऊ दिघे
रविवार, 23 जुलै 2017

संगमनेर तालुक्यातील पठार भागासह अन्य ठिकाणी असलेले वाळूसाठे आता महसूल विभागाच्या रडारवर आहेत. पावसाळ्यात मुळा व प्रवरा नद्यांना पाणी असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच वाळूसाठे करून ठेवतात. नद्यांना पाणी आल्यावर हीच वाळू अत्यंत महागड्या दराने विक्री केली जाते

तळेगाव दिघे ( जि. नगर ) - संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जांबुत बुद्रुक, खैरदरा व मोरेवस्ती या तीन ठिकाणी अवैधरित्या साठवून ठेवलेल्या वाळू साठयांवर छापा टाकून २५० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर यांनी ही कारवाई केली. या कारवाईने वाळूसाठा करणाऱ्या तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक शिवारात डोंगराच्या पायथ्याशी व खैरदरा, मोरेवस्ती या ठिकाणी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आला असल्याची माहिती आंबेकर यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी मंडलाधिकारी गुलाबराव कडलग, कामगार तलाठी रामदास मुळे व बाळकृष्ण सावळे यांच्यासह महसूल पथकाने वाळू साठ्यांवर छापा टाकला. या छाप्यात अवैधरित्या साठविलेली तब्बल २५० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. मुळा नदीला पाणी असल्यामुळे नदीपात्रातून वाळू उपसा करुन अवैधरित्या हा साठा करण्यात आला होता. यातील काही वाळूसाठा शासकीय कामांसाठी करण्यात आला होता का,  याची खातरजमा केली जात आहे. २५० ब्रास वाळूसाठा जप्त करण्याच्या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

वाळूसाठे महसूलच्या रडारवर !
संगमनेर तालुक्यातील पठार भागासह अन्य ठिकाणी असलेले वाळूसाठे आता महसूल विभागाच्या रडारवर आहेत. पावसाळ्यात मुळा व प्रवरा नद्यांना पाणी असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच वाळूसाठे करून ठेवतात. नद्यांना पाणी आल्यावर हीच वाळू अत्यंत महागड्या दराने विक्री केली जाते.

टॅग्स