पाचशे गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा आधार'!

हरिभाऊ दिघे 
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पाचशे विद्यार्थ्यांना मदत..
लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर तर्फे तळेगाव दिघेसहित परिसरातील दहा शाळांमधील पाचशे विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश, स्कूल बॅग व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी हरखून गेले होते. 'गणवेश' चित्रपट फेम बालकलाकार तन्मय मांडे याने यावेळी मनोगत व्यक्त केले.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर लायन्स क्लब ऑफ सफायर तर्फे तळेगाव दिघेसह परिसरातील दहा माध्यमिक शाळांमधील पाचशे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, स्कूल बॅग व खाऊ देवून मदतीचा आधार देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी आनंदले. संगमनेर लायन्स क्लबच्या दानशूर हातांनी हा उपक्रम राबविला.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व स्कूल बॅग वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर गिरीश मालपाणी होते. प्रसंगी श्रीनिवास भंडारी, विजय सारडा, योगेश शहा, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दत्तात्रेय जोंधळे, गणवेश चित्रपट बाल कलाकार तन्मय मांडे, प्राचार्य बी. के. कुटे, उपमुख्याध्यापक संपतराव मुळे, संदीप चोथवे, रोहित मणियार, जितेश लोढा, मिलिंद पलोड, देविदास गोरे, शैलेन्द्र गाडेकर उपस्थित होते.

गिरीश मालपाणी म्हणाले, ग्रामीण भागातून मोठे लोक शिकले व घडले. त्यामुळे ग्रामीण शहरी तुलना होता कामा नये. कष्ट घेतल्यास माणूस मोठा होतो. जीवनात मोठे व्हाल तेव्हा गरजूंना मदतीचा हात द्या. शिक्षकांचे काम अवघड असते. विद्यार्थी जीवनात मोठा झाल्यावर शिक्षकांना आनंद मिळतो. कष्ट केल्यास यश निश्चित मिळते. विद्यार्थ्यांनी यशासाठी परिश्रम घ्यावेत. मोठे झाल्यावर गरजूंना मदतीचा हात द्यावा, असे सांगत त्यांनी लायन्सच्या कार्याची माहिती दिली.

दत्तात्रेय जोंधळे म्हणाले, ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशासाठी पुढाकार घेत लायन्स क्लबने सुरु केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यातून इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.

संदीप चोथवे यांनी प्रास्ताविकातून लायन्स क्लबचे कार्य व उपक्रमांची माहिती दिली. प्रसंगी मिलिंद पलोड, चंद्रभान हापसे, हरिभाऊ दिघे, बाल कलाकार तन्मय मांडे यांची भाषणे झाली. सरस्वती पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. श्रीनिवास भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. देविदास गोरे यांनी आभार मानले.

पाचशे विद्यार्थ्यांना मदत..
लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर तर्फे तळेगाव दिघेसहित परिसरातील दहा शाळांमधील पाचशे विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश, स्कूल बॅग व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी हरखून गेले होते. 'गणवेश' चित्रपट फेम बालकलाकार तन्मय मांडे याने यावेळी मनोगत व्यक्त केले.