शेगावच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास झाला पाहिजेः पाटील 

अभय जोशी
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा श्री.पाटील यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता सपत्निक करण्यात आली. त्यानंतर त्यांचा व वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळालेल्या चव्हाण दांम्पत्याचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

पंढरपूर : महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनता सुखी आणि सुरक्षित राहू दे असे साकडे आपण श्री विठ्ठलाला घातले आहे. शेगावच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास झाला पाहिजे. विठ्ठलाच दर्शनानंतर जसे समाधान मिळते तसे येथे आल्यानंतर येथील व्यवस्थांमुळे देखील समाधान मिळाले पाहिजे. आगामी काळात पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी जादा निधी आपण मिळवून देऊ असे आश्‍वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

कार्तिकीतील प्रबोधिनी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. या पूजेनंतर मंदिरातील सभामंडपामध्ये आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. 

यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान यंदा कर्नाटकातील विजापूर येथील कर्नाटक राज्य परिवहन मंडळात वाहक (कंडक्‍टर) म्हणून काम करत असलेले वारकरी बळीराम शेवू चव्हाण (वय 40 ) व त्यांच्या पत्नी शिनाबाई चव्हाण (वय 35 ) यांना मिळाला. 

श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा पाटील यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता सपत्निक करण्यात आली. त्यानंतर त्यांचा व वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळालेल्या चव्हाण दांम्पत्याचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी बोलताना पाटील म्हणाले, काल आपण पंढरपूर मधील अनेक मठांना भेटी दिल्या. वारकऱ्यांशी संवाद साधला. तेंव्हा अनेकांनी शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याचे आपल्याला सांगितले. आगामी काळात पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी आपण आवश्‍यक तो निधी मिळवून देऊ. 

प्रारंभी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी प्रास्ताविकात समितीच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार असलेल्या योजनांची माहिती सांगितली. 

कार्यकारी अधिकारी संजय तेली, सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितांचे सत्कार करण्यात आले. 

सूत्रसंचलन मंदिर समितीचे सदस्य गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले तर नगराध्यक्षा साधना भोसले यांनी आभार मानले. 

यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधिक्षक विरेश प्रभू, सहायक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी डॉ.विजय देशमुख आदी उपस्थित होते. 

डॉ. अतुल भोसले यांचा विशेष सत्कार
मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी भाविकांना सुविधा देण्यासाठी अनेक योजना आखून त्याची कार्यवाही सुरु केल्याबद्दल महसूलमंत्री श्री.पाटील यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांचा विशेष सत्कार केला. वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी श्री.भोसले यांनी सुरु केलेल्या प्रयत्नाला शासन संपूर्ण सहकार्य करले असे त्यांनी नमूद केले. सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने शहर सरचिटणीस संजय वाईकर व चिटणीस शंतनु दंडवते यांनी श्री.पाटील यांचा सत्कार केला. 

एसटी चा मोफत प्रवास पास
वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळालेल्या दांम्पत्याला एसटी महामंडळाच्या वतीने वर्षभर मोफत प्रवासाचा पास दिला जातो. त्यामुळे कर्नाटक राज्य परिवहन मंडळात वाहक असलेल्या चव्हाण यांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा पास आज मिळाला.