तुंगपर्यंतच्‍या रस्‍त्‍यासाठी आठ वर्षांत १८ कोटींचा चुराडा

प्रमोद जेरे
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मिरज - सांगली-पेठ रस्त्यावरील सांगलीवाडी-तुंग दरम्यान केवळ बारा किलोमीटर रस्त्यावर आठ  वर्षांत १८ कोटींचा चुराडा झाला आहे. याशिवाय  २००८ ते २०१० या दरम्यान याच रस्त्यावर दुरुस्तीपोटी १८, १५, ४४, २८, ५०, आणि २० लाख अशी पावणेदोन कोटींची रक्कम खर्च झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील आकडेवारी सांगते. 

मिरज - सांगली-पेठ रस्त्यावरील सांगलीवाडी-तुंग दरम्यान केवळ बारा किलोमीटर रस्त्यावर आठ  वर्षांत १८ कोटींचा चुराडा झाला आहे. याशिवाय  २००८ ते २०१० या दरम्यान याच रस्त्यावर दुरुस्तीपोटी १८, १५, ४४, २८, ५०, आणि २० लाख अशी पावणेदोन कोटींची रक्कम खर्च झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील आकडेवारी सांगते. रस्त्याची सध्याची दुरवस्था पाहता हा पैसा नेमका कोठे मुरला, याचे उत्तरही आता याच विभागानेच दिले पाहिजे.

या रस्त्याचे कवित्व सध्या सुरू आहे. मुळात हे आघाडी सरकारचेही पाप आहे. या काळात तीन मंत्री या जिल्ह्यात होते. त्यांनी काय केले? आणि तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजपनेही काय दिवे लावले, असा प्रश्‍न उपस्थित होतो. आयर्विन पुलापासून संपूर्ण रस्ता आज मृत्यूचा सापळा बनला. गेल्या आठ वर्षांत रस्त्यावर होणारा कोट्यवधींचा खर्च पाहता आज सुरू असलेल्या आंदोलनाचा निरर्थकपणाही पुढे येतो. केवळ १२ किलोमीटरच्या रस्त्यावर आठ वर्षांत १८ कोटी रुपयांचा खर्च होतो.

एवढा खर्च होऊनही खराब झालेल्या  रस्त्यावर केवळ एकाच ठेकेदाराकडून खड्डे भरण्याचे  काम सुरू आहे. जे काम त्यांनेच काही वर्षांपूर्वी केले आहे. पण जी कामे अन्य ठेकेदारांनी केली आणि पैसे घेऊन रिकामे झाले. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत कोणीच बोलत नाहीत. आंदोलने ही केवळ चमकोगिरी करणारी असली की अधिकारी आणि नेत्यांना याचा  नेमका अंदाज येतो आणि त्यामुळेच जुजबी उपाय केल्यासारखे दाखवायचे आणि आंदोलनकर्त्यांची समजूत काढायची याचे पक्के नियोजन ठेकेदार आणि नेत्यांकडून होते. आजही याच रस्त्यावर सुरू असलेली दुरुस्ती ही जुजबीच आहे. आंदोलनाचा जोर ओसरला की पुन्हा तेच रस्ते तेच खड्डे आणि हे सगळे करणारे नेते आणि ठेकेदारही तेच याशिवाय वेगळे चित्र असणार नाही. 

तुंगपर्यंतच्या रस्त्यावर झालेला इतका प्रचंड खर्च पाहता आता संपूर्ण इस्लामपूरपर्यंतच्या सुमारे ३५ किलोमीटर रस्त्यावर झालेल्या एकूण खर्चाबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. हा संपूर्ण रस्ता पाच ठेकेदारांनी सातत्याने केला आहे. या रस्त्याबाबत आणखी एक गंमतीचा भाग म्हणजे डिग्रज फाटा ते तुंगपर्यंतच्या रस्त्यावरील क्रश (थर) ३० एमएमचा आहे. त्याचवेळी तुंगपासून तीन किलोमीटपर्यंतचा पुढचा थर ६५ एमएमचा आहे. एकाच रस्त्यावरील दोन थर करण्यामागे नेमके प्रयोजन लक्षात येत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदारांनी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा रस्ता गिळंकृत केला. आताही तीच परंपरा सुरू आहे.

रस्त्याच्या लांबी-रुंदीत कधीही घोळ घातला जात नाही, कारण ही बाब सामान्यांनाही समजून येते. प्रत्यक्ष घोळ घातला जातो त्या रस्त्याच्या जाडीमध्ये. त्यात बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार सामील असतात. रस्त्यांचीदेखील दुरुस्तीही करून घेतली जात नाही. केले असेल, तर बांधकाम विभागाने ते जाहीरच करावे. त्यात केवळ ठेकेदारांचीही चूक म्हणता येणार नाही, कारण यंत्रणाच भ्रष्ट आहे. अधिकाऱ्यांना पैशांची गरज  असल्याने अशी बोगसगिरी दिसून येते. या सर्व अधिकाऱ्यांच्या पदव्या तपासाव्यात, अशी मागणी सुधार समितीतर्फे करणार आहोत.
- आर्किटेक्‍ट रवींद्र चव्हाण, जिल्हा सुधार समिती, सांगली

रस्त्यांचे कंत्राटदार
१) किलोमीटर क्रमांक ३०. ०० ते ३१. ३०० 
 खर्च- तीन कोटी
 ठेकेदार - बी. बी. गुंजाटे
 काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण काम अद्यापही सुस्थितीत

२) किलोमीटर क्रमांक ३१. ३०० ते ३६. ००  
 खर्च ६ कोटी १६ लाख 
 ठेकेदार- संजय अवताडे
 रस्ता खराब झाल्याने कामाचे अंतिम बिल दिले नाही. याच ठेकेदाराकडून सध्या दुरुस्ती सुरू

३) किलोमीटर क्रमांक ३६ ते ४१. ८५०
 खर्च ६ कोटी ३८ लाख
 ठेकेदार गैबान कन्स्ट्रक्‍शन
 काम २०१२ मध्येच पूर्ण
 

Web Title: Sangli News Tung road issue