मुख्यमंत्री येईपर्यंत जाळू नका; शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

farmer suicide in karmala
farmer suicide in karmala

करमाळा - वीट (ता. करमाळा) येथील शेतकरी धनाजी चंद्रकांत जाधव (वय 42) यांनी कर्जाला कंटाळून बुधवारी रात्री नऊ वाजता आत्महत्या केली.

त्यांनी मृत्युपूर्वी "मी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्याशिवाय मला जाळायचे नाही,' अशा आशयाची चिठ्ठी लिहिली. ती त्यांच्या खिशात सापडली.

बुधवारी नऊ वाजता वीट गावातून आल्यानंतर जाभुंझरा वस्तीवरील शेतातील चिंचेच्या झाडाला गळ्यातील गमजाने (पंचा) त्यांनी गळफास घेतला. राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर ही आत्महत्या झाली आहे. 

आपली मुले योगीराज व युवराज यांच्याकडे लक्ष ठेवण्याची विनंतीही त्यांनी चिठ्ठीत केली आहे. योगीराज हा बारावीत तर युवराज नववीत शिकत आहे. पत्नी, आई-वडील असा त्यांचा परिवार आहे. त्यांचे पार्थिव रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी करमाळा येथे हलविण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येईपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

स्टेट बँकेचे कर्ज
धनाजी जाधव यांच्या नावावर दोन एकर जमीन आहे. त्यांच्यावर स्टेट बॅंक ऑफ करमाळाचे कर्ज आहे. कर्जाचा आकडा समजू शकला नाही. त्यांच्या खिशात सापडलेली चिठ्ठी उभी फाडलेली आहे. गेल्या वर्षी त्यांनी शेतात ज्वारीचे पीक घेतले होते. त्यातून उदरनिर्वाहापुरती ज्वारी झाली होती. याशिवाय ते गावातील दिगंबर चोपडे यांच्या ट्रॅक्‍टरवर ड्रायव्हर म्हणून काम करत. करमाळा ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश देवरे अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com