मंदीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पिंपरी - नोटाबंदी, जीएसटी यामुळे उद्योग धंद्यावर परिणाम झाल्याने वर्गणीदारांनी आखडता हात घेतला. याचा फटका गणेश मंडळांना बसला आहे. याशिवाय बांधकाम व्यावसायिक, पतसंस्था या हमखास जाहिरात देणाऱ्यांनी देखील पाठ फिरविल्याने यंदा अनेक मंडळांनी देखावे सादर केले नाहीत. मात्र मोठ्या उत्साहात भर पावसात देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गणेश भक्‍तांचा हिरमोड झाला आहे.

पिंपरी - नोटाबंदी, जीएसटी यामुळे उद्योग धंद्यावर परिणाम झाल्याने वर्गणीदारांनी आखडता हात घेतला. याचा फटका गणेश मंडळांना बसला आहे. याशिवाय बांधकाम व्यावसायिक, पतसंस्था या हमखास जाहिरात देणाऱ्यांनी देखील पाठ फिरविल्याने यंदा अनेक मंडळांनी देखावे सादर केले नाहीत. मात्र मोठ्या उत्साहात भर पावसात देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गणेश भक्‍तांचा हिरमोड झाला आहे.

दरवर्षी शहरातील गणेश मंडळांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे वर्गणी नेमकी कोणाला आणि किती द्यायची, असा प्रश्‍न व्यापाऱ्यांना पडला आहे. याशिवाय नोटाबंदी आणि त्यानंतर आलेल्या जीएसटीमुळे अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. यामुळे अनेकांनी मंदीचे कारण पुढे करीत ‘वर्गणीसाठी यंदा आम्हाला माफ करा,’ असे सांगत अक्षरशः हात जोडले.

कोणावरही वर्गणीसाठी जबरदस्ती करू नका, जबरदस्ती केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा पोलिसांकडून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला जात आहे. पोलिसही कार्यकर्त्यांवर नजर ठेवून आहेत. तर दुसरीकडे घरोघरी वर्गणीसाठी गेल्यास ‘उद्या या’ असे सांगितले जाते. मात्र वारंवार वर्गणीसाठी कार्यकर्ते जाण्यास तयार नसतात. यामुळे वर्गणी कमी जमा झाली आहे.

महागाईमुळे खर्चात वाढ
एकीकडे वर्गणी कमी जमली असताना दुसरीकडे मात्र दरवर्षीप्रमाणे मंडप, देखावे, मूर्ती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि वाद्यपथक यांनी मानधनात सुमारे दहा ते २५ टक्‍के वाढ केली आहे. यामुळे वाढत्या खर्चाचा ताळमेळ बसविताना मंडळांच्या कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काहींनी कार्यक्रमात कपात न करता मंडळाने बॅंकेत जमा केलेली रक्‍कम या कामासाठी वापरत आहेत.

पुढाऱ्यांकडून आखडता हात
गेल्या वर्षी महापालिका निवडणूक जवळ आल्याने एकाच मंडळांना अनेक इच्छुकांकडून तब्बल पाच आकडी वर्गणी मिळाली होती, तर काहींनी ढोल पथकासह विसर्जन मिरवणुकीची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र यंदा निवडणुकीसाठी खर्च झाल्याचे सांगत विद्यमान नगरसेवकांनी आणि पराभूत उमेदवारांनीही मंडळांच्या कार्यकर्त्यांची पाचशे-हजारांवर बोळवण केली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वर्गणीची रक्‍कम निम्म्याने घटली आहे. वर्गणीसाठी कोणावरही जबरदस्ती करीत नाही. वर्गणी कमी झाल्याने सर्वच कार्यक्रमासही कात्री लावावी लागली आहे. स्वतःच्या खिशातून पैसे टाकत कार्यक्रम पार पाडत आहोत.
- गजानन मोरे, जाणता राजा ग्रुप मित्र मंडळ, कासारवाडी