पीएमपी घेणार 1000 बस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात १००० बस घेण्यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाने बुधवारी घेतला. शहरातील वाढत्या प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन ५०० इलेक्‍ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश आहे. तसेच महिलांसाठी ३३ तेजस्विनी बस खरेदी करण्यासही या वेळी मंजुरी देण्यात आली. 

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुण्याच्या स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, पिंपरी-चिंचवडच्या स्थायीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे, पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, सीआयआरटीचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. 

असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंगमार्फत (एएसआरटीयू) ५५० वातानुकूल (एसी) बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठीची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय या वेळी झाला. पीएमपीसाठी प्रत्येकी ४०० डिझेल आणि सीएनजीवरील बस विकत घेण्याचीही निविदाही रद्द झाली. त्या वेळी सीएनजी आणि डिझेलवरील बस विकत घेण्याचा आणि इलेक्‍ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय या वेळी झाला.

पीएमपीच्या ताफ्यात बस संख्या अपुरी आहे. २०० बस १२ वर्षांपूर्वीच्या असून, त्या तातडीने ‘स्क्रॅप’ करण्याची गरज आहे. त्यामुळे बस खरेदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या बस तातडीने उपलब्ध होतील, यासाठीचे नियोजन करण्याचे आदेश पीएमपी प्रशासनाला दिले आहेत. येत्या १५ दिवसांत त्याचा पुन्हा आढावा घेण्यात येईल. बस खरेदीच्या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 
- मुक्ता टिळक, महापौर

नव्या बसची संख्या
400 - सीएनजीवर धावणाऱ्या
100  - डिझेलवर धावणाऱ्या
500 - इलेक्‍ट्रिक (भाडेतत्त्वावर) 

Web Title: 1000 bus purchase by pmp