नीटसाठी वीस हजार विद्यार्थी 

नीटसाठी वीस हजार विद्यार्थी 

पुणे - एकीकडे परीक्षेच्या ॲडमिट कार्डवर छायाचित्र चिकटविण्याची घाई, विद्यार्थिनींकडील कानातले-नाकातले, तर विद्यार्थ्यांच्या गळ्यातील चेन, हातातील ब्रेसलेट, घड्याळ काढण्याची लगबग, तर दुसरीकडे परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची सुरू असलेली तपासणी, नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी सज्ज असलेले अधिकारी आणि कर्मचारी अशा काहीशा ‘टेन्शन’मय वातावरणात शहरातील जवळपास ३० हून अधिक परीक्षा केंद्रांवर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) पार पडली. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी शहरातील सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) देशभरातील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही सामाईक परीक्षा रविवारी घेण्यात आली. देशातील १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत जवळपास दोन लाखांनी भर पडली आहे. या परीक्षेत राज्यातील सुमारे एक लाख ८३ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. देशात महाराष्ट्रातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे; तर पुणे शहर आणि जिल्ह्यातून जवळपास वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. 

सरकारी, खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली. सातारा, सांगली, सोलापूर अशा विविध ठिकाणांहून विद्यार्थी परीक्षेसाठी पुण्यात आले होते. काहींनी आदल्या दिवशी परीक्षा केंद्राच्या जवळपास असणाऱ्या नातेवाइकांकडे, हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला होता. पालकांनी पहाटेपासूनच परीक्षा केंद्र गाठण्याचा प्रवास सुरू केला होता.

नोंदणीकृत विद्यार्थी  १३,२६, ७२५
परीक्षा केंद्रे - २,२५५
हजर विद्यार्थी - 13,२६,७२४
अनिवासी भारतीय - १,८४२
परदेशी विद्यार्थी - ६२१


नीट ही परीक्षा देणारे विद्यार्थी आगामी काळात वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून कुशल डॉक्‍टर होणार आहेत. काटेकोर नियमांचे पालन विद्यार्थ्यांनी करणे, म्हणजे शिस्तप्रिय डॉक्‍टर बनण्याच्या प्रवासाची पहिली पायरी म्हणता येईल. अटी त्रासदायक वाटत असल्या तरी त्या आवश्‍यक आणि योग्य वाटतात.
- सुरेश मेमाणे, पालक

अटींच्या पूर्ततेसाठी धावाधाव
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये सोडण्यासाठी ‘ए-सॉल्ट’ आणि ‘बी-सॉल्ट’ अशी दोन टप्प्यांत विभागणी केली होती. ‘ए-सॉल्ट’मधील विद्यार्थ्यांना सकाळी साडेसात वाजल्यापासून, तर ‘बी-सॉल्ट’मधील विद्यार्थ्यांना सकाळी साडेआठ वाजल्यापासून प्रवेश देण्यात येत होते. मात्र, परीक्षेच्या काळजीपोटी अनेक पालकांनी आपल्या मुलांसह सकाळी सहा, साडेसहा वाजताच परीक्षा केंद्र गाठले होते. 

सीबीएसईच्या नियमानुसार विद्यार्थिनींनी कानातली किंवा नाकातली रिंग, बांगड्या, गळ्यातले आदी दागदागिने काढले आहेत का, विद्यार्थ्यांनी शूज, बेल्ट घातला नाही ना?, तसेच ॲडमिट कार्डवर फोटो आणि पालकांची स्वाक्षरी आहे का, हे तपासून विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश दिला जात होता. 

परीक्षेसाठीच्या अटींची पूर्तता करण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागत होती. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी-पालक आणि केंद्रातील अधिकारी यांच्यात किरकोळ बाचाबाची होत होती. सीबीएसईच्या अटीनुसार पेहराव न केल्याने औंधमधील केंद्रीय विद्यालयातील परीक्षा केंद्राबाहेर एका विद्यार्थ्याला शर्टची अदला-बदल करावी लागली. ॲडमिट कार्डवर छायाचित्र चिकटविणे, पालकांची स्वाक्षरी करणे, अशी लगबग शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. रेंजहिल्स येथील केंद्रीय विद्यालयातील परीक्षा केंद्रावर शेवटच्या क्षणी पोचलेल्या विद्यार्थिनीचे केस मोकळे सोडलेले होते. परीक्षेसाठीच्या प्रवेशाला अवघे दोन मिनिटे असतानाच तिच्या आईच्या लक्षात आले आणि तिने पटकन मुलीच्या केसांची वेणी घातली आणि तिला परीक्षेला मिळवून दिला. परीक्षेच्या सर्व सूचनांची पूर्वकल्पना असतानाही पालकांचा ऐनवेळी गोंधळ उडाल्याचे निदर्शनास येत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com