बेकारीची कुऱ्हाड 30 हजार कामगारांवर

अनंत काकडे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

चिखली - प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयानंतर कुदळवाडी, तळवडे, भोसरी येथील उद्योग आता ठप्प झाले आहेत. प्लॅस्टिकशी संबंधित असणाऱ्या उद्योगांना त्याचा सरळ फटका बसणार असून, सुमारे ३० हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचा अंदाज उद्योग जगतातून व्यक्त केला जात आहे. 

चिखली - प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयानंतर कुदळवाडी, तळवडे, भोसरी येथील उद्योग आता ठप्प झाले आहेत. प्लॅस्टिकशी संबंधित असणाऱ्या उद्योगांना त्याचा सरळ फटका बसणार असून, सुमारे ३० हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचा अंदाज उद्योग जगतातून व्यक्त केला जात आहे. 

कुदळवाडी, चिखली, तळवडे, भोसरी तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात लघू मध्यम आणि मोठे मिळून अडीचशेच्या आसपास प्लॅस्टिकशी संबंधित उद्योग आहेत. कच्चा माल बनविण्यापासून प्लॅस्टिक बनविण्याचे काम या कारखान्यात चालते. कुदळवाडी, तळवडे परिसरांत शहरातील ५० टक्के उद्योग असून, भंगार मालातील प्लॅस्टिकची वर्गवारी करून त्यापासूनही नवीन प्लॅस्टिक बनविण्याचे काम चालते. या उद्योगात शहरातील सुमारे तीस हजार कामगार राबतात. त्यात महिला कामगार ६० टक्के आहेत.

राज्य सरकारने नुकताच प्लॅस्टिकबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर हे उद्योग ठप्प झाले आहेत. प्लॅस्टिकच्या इतर वस्तू बनविणाऱ्या उद्योगांवर याचा परिणाम झाला नसला, तरी प्लॅस्टिक बॅग बनविणाऱ्या उद्योगाला त्याचा फटका बसला आहे. प्लॅस्टिक आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची विक्री होत नसल्याने त्याचा सरळ फटका कामगारांना बसला आहे. तर काही कारखानदार पर्यायी व्यवसायाच्या शोधात आहेत.

पर्यायी रोजगार द्यावा - म्हेत्रे 
तळवडे, चिखली, भोसरी परिसरांत २५ ते ३० टक्के कारखाने प्लॅस्टिक संबंधित आहेत. तसेच तीस हजार कामगारांना त्याचा फटका बसू शकतो. यात महिलांची संख्या अधिक आहे. उद्योजकांनी पर्यायी उद्योग शोधून कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे यांनी केली.

कुदळवाडी, तळवडे परिसरांत सुमारे शंभर लघुउद्योग प्लॅस्टिक उद्योगाशी संबंधित आहे. बंदी जाहीर झाल्यापासून प्लॅस्टिक बनविण्यासाठी तयार केलेल्या कच्च्या मालाची विक्री ठप्प आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.   
- शब्बीर शेख, प्लॅस्टिक उद्योजक

Web Title: 30000 worker unemployed plastic ban