pimpri
pimpri

दहा हजार चारशे त्र्याहात्तर कुटुंबांना मिळाले वैयक्तिक स्वच्छतागृह

पिंपरी - महापालिका प्रशासनाला स्वच्छ भारत अभियानांतर्गत जून अखेर 10 हजार 473 कुटुंबांना वैयक्तिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे शक्‍य झाले आहे. तर, 465 सामुदायिक स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जानेवारी महिन्यात शहर हागणदरीमुक्त करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात सहाव्या क्रमांकावरून पुन्हा पहिल्या क्रमांकावर येण्याचे मोठे आव्हान कायम आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात ज्या कुटुंबांकडे स्वतंत्र स्वच्छतागृह नाही त्यांना वैयक्तिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी निधी दिला जातो. या अभियानात प्रत्येक स्वच्छतागृहासाठी केंद्र, राज्य सरकार अनुदान आणि महापालिका हिस्सा असे एकूण 16 हजार रुपये दिले जातात. महापालिकेकडे वैयक्तिक स्वच्छतागृहांसाठी 14 हजार 10 नागरिकांनी अर्ज केले. त्यातील 13 हजार 681 अर्ज स्वच्छ भारत अभियानच्या संकेतस्थळावर अपलोड केले. तर, 11 हजार 17 अर्ज मंजूर केले. आत्तापर्यंत 10 हजार 473 वैयक्तिक स्वच्छतागृहांची उभारणी झाली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महापालिका क्षेत्रात 11 हजार 684 कुटुंबांना वैयक्तिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी निधी मिळणे आवश्‍यक आहे. 

स्वच्छतागृह उभारणीसाठी कंपन्यांनी महापालिकेला सीएसआर उपक्रमात मदत केली. सॅमटेक क्‍लीन अँण्ड क्‍लीअरतर्फे निगडी बसथांबा येथे महिलांसाठी पहिले ऍटोमॅटिक स्वच्छतागृह उभारले. शेल्टर असोसिएट्‌सने वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणीसाठी मोलाचा वाटा उचलला. एक्‍साईड इंडस्ट्रीजने केएसबी चौक, थरमॅक्‍स चौक आणि एसकेएफ कंपनीशेजारी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले. स्वच्छ सर्वेक्षणात महापालिका सध्या राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे. दोन वर्षापूर्वी महापालिका राज्यात पहिल्या क्रमांकावर होती. सध्या घसरलेला आलेख पाहता पुन्हा अव्वलस्थानी येण्याचे आव्हान कायम आहे. 

पाच लाखाचा दंड वसूल 
राज्यात 23 मार्चपासून प्लॅस्टिक बंदी लागू झाली. त्यानंतर महापालिकेने सलग मोहिमा राबवून आत्तापर्यंत 99 व्यापाऱ्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 1 हजार 677 किलो प्लॅस्टिक जप्त केले. तसेच, 4 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल केला. 

आकडे बोलतात... 
* सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृह: सुमारे 6393 
* स्वच्छ भारत अभियान: वैयक्तिक स्वच्छतागृह: 10473, सामुदायिक स्वच्छतागृह:     465 
* वैयक्तिक स्वच्छतागृह: मनपामार्फत बांधकाम : 6971, सीएसआर उपक्रमात             बांधकाम : 3502 

महापालिकेला शहर हागणदरीमुक्त करण्यात यश आले आहे. त्यामध्ये हागणदरीमुक्त + (ओडीएफ + ) हा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त

जागतिक स्वच्छता दिनानिमित्त गुरुवारी (ता.12) क्षेत्रीय कार्यालयातर्फे सकाळी 7 ते 11 या वेळेत कार्यालयांच्या नियोजनानुसार स्वच्छता मोहीम घेण्यात येईल. 
- मनोज लोणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी 

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com