अजित पवार यांचे आज बैठकांचे सत्र

अजित पवार यांचे आज बैठकांचे सत्र

पिंपरी  - केंद्र व राज्य सरकारविरोधात केलेल्या हल्लाबोल आंदोलनामुळे निर्माण झालेले वातावरण, वर्षभरात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष संघटनेतील मरगळ झटकून पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरवात केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी (ता. ३०) शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात बैठका घेऊन संवाद साधणार आहेत.

पालिकेतील पंधरा वर्षांची सत्ता गेल्या वर्षी अनपेक्षितपणे गमवावी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठे नैराश्‍य निर्माण झाले. अनेक प्रमुख कार्यकर्ते भाजपात गेले. भाजपच्या नगरसेवकांमध्ये पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. किंबहुना, महापालिकेत सध्या तेच सत्ता राबवीत आहेत. पहिल्यांदाच विरोधी बाकांवर बसलेल्या राष्ट्रवादीला पालिकेत सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी अद्यापही सूर सापडलेला नाही. शहराचा विकास पवार यांच्या नेतृत्वाखाली झाला असला, तरी पालिकेतील पराभवानंतर शहरातील लक्ष काढून घेतल्याचे जाणवते.

या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिन्यात राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने शहरात घेतलेल्या सभांमध्ये प्रदेश पातळीवरील नेत्यांनी भाजप सरकारवर हल्ला करताना स्थानिक राजकारणावरही भाष्य केले. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना घरवापसीची संधी देऊ नये, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. अन्य काही नेत्यांनीही तीच भूमिका मांडली होती. या हल्लाबोल आंदोलनाची सांगता पुण्यातील सभेने होणार आहे. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अकरा विधानसभा मतदारसंघात अजित पवार स्वतंत्र बैठका घेत आहेत.

लोकसभेचे मावळ व शिरूर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत. तेथे लढत देण्याची तयारी भाजपच्या दोन आमदारांनी सुरू केली आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी असली, शिरूरमध्ये तिरंगी लढतीत ते अटीतटीची लढत देऊ शकतील. या दोन उमेदवारांसह, शहरातील विधानसभेच्या तीनही मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांची नावे ठरवावी लागतील. मतदारसंघाची बांधणी, बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची नियुक्ती या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू करावी लागेल. त्या दृष्टीने पवार यांच्या बैठका पक्षांतर्गत पातळीवर महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्या दृष्टिकोनातून महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. महापालिकेतील प्रश्‍नांवर आक्रमक भूमिका घेतानाच शहर पातळीवर सर्वसामान्यांच्या समस्या मांडत सत्ताधारी पक्षाविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याबाबत या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांशी ते संवाद साधण्याची शक्‍यता आहे.

बैठकांची ठिकाणे
भोसरी मतदारसंघातील बैठक अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सकाळी साडेनऊ वाजता, पिंपरी मतदारसंघातील बैठक आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील केरला भवनमध्ये दुपारी अडीच वाजता आणि चिंचवड मतदारसंघातील बैठक पिंपळे गुरवमधील कै. निळू फुले नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com