"स्वीकृत'ची निवड लांबण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

स्वीकृत सदस्यपदासाठी आयुक्तांकडे नावे दिलेली असली तरी पक्षाच्या सूचनेनुसार त्यात फेरबदल करण्याचे अधिकार पक्षाला आहेत. त्यामुळे कागदपत्रांची छाननी करून वादग्रस्त नावांबद्दल पुनर्विचार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
- आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नियोजित स्वीकृत सदस्यांच्या नावांत फेरबदल करता येणे शक्‍य असल्याने येत्या 19 तारखेला होणारी स्वीकृत सदस्यांची निवड लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. नियोजित नावांत बदल करता येणे शक्‍य असल्याचे रविवारी पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नियोजित बाबू नायर व माऊली थोरात यांची नावे बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियोजित स्वीकृत सदस्यांची नावे बदलण्याचे अधिकार पक्षाला आहेत. त्यामुळे श्रेष्ठींच्या परवानगीने बदल करता येतो. सध्या बाबू नायर व माऊली थोरात यांच्या नावांबद्दल पक्षात जोरदार विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत. शहराध्यक्षांना कोअर कमिटीने नावे देण्याचे अधिकार दिलेले असताना खासदार अमर साबळे व राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून नायर व थोरात यांची नावे सुचविली होती. मात्र, या दोघांनीही सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तांत्रिक चुका असल्याचे बोलले जात आहे. सदस्य निवडीत अडचणी नको म्हणून या दोन्ही नावांचा पुनर्विचार होण्याची शक्‍यता असल्याने येत्या 19 मे रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्य निवडी संबंधीचा प्रस्ताव तहकूब होण्याची दाट शक्‍यता आहे. 

Web Title: approved member issue in pcmc