पुलासाठी वर्षभराची प्रतीक्षा

Over-Bridge
Over-Bridge

पिंपरी - निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते किवळेतील मुकाई चौक या दरम्यानच्या ४५ मीटर रुंदीचा रस्ता करण्यात येत आहे. त्यासाठी रावेत येथील शिंदेवस्तीजवळ लोहमार्गावर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलावर लोहमार्गाच्या ठिकाणी ८० मीटर लांबीच्या जागेत लोखंडी गर्डर बसविण्यात येणार आहे. त्याची तपासणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ८) केली. ८९० मीटर लांबीच्या या पुलाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल. 

पुलाच्या निगडी बाजूचा तीनशे मीटर लांबीचा पोच (ॲप्रोच) रस्ता पूर्ण झाला आहे. रावेत बाजूच्या पोच रस्त्याची १६५ मीटर लांबीची जागा ताब्यात आलेली नाही. पुलासाठी असलेल्या ३१ खांबांपैकी ३० खांब बांधून पूर्ण झाले आहेत. राहिलेल्या पुलाच्या जागी रेल्वेचे सबस्टेशन आहे. ते तेथून स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेने रेल्वेला पाच कोटी ९४ लाख रुपये दिले. भेगडेवाडीला नवीन सबस्टेशन उभारण्यात आले आहे. पुढील आठवड्यात स्थलांतर करण्यास प्रारंभ होणार असून, त्यानंतर महिनाभरात तेथे खांब उभारण्यात येईल.

लोहमार्गावर ५० मीटर लांबीचा, तर त्या अलीकडील नियोजित लोहमार्गाच्या जागेवर तीस मीटर लांबीचा पूल लोखंडी गर्डरचा बांधण्यात येणार आहे.

त्यासाठी तीस मीटर लांबीचे व अडीच मीटर रुंदीचे सहा गर्डर तयार करण्यात आले आहेत. त्याची तपासणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली. तीन गर्डर एका पुलावर बसविण्यात येतील, तर तीन गर्डर लगतच्या पुलावर बसविण्यात येतील. त्यासाठी दोनशे टन वजनाची क्रेन आणण्यात येणार आहे. ५० मीटर लांबीचे गर्डर सध्याच्या लोहमार्गावर दोन महिन्यांनी बसविण्यासाठी रेल्वेचा मेगा ब्लॉक घ्यावा लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेचे बीआरटीचे प्रवक्‍ते विजय भोजने म्हणाले, ‘‘पुलासाठी २९ बॉक्‍स गर्डर बसविण्यात येतील. त्यापैकी सोळा बसविले असून, आणखी पाच गर्डर डिसेंबरपर्यंत बसविले जातील. रावेत बाजूच्या ॲप्रोच रस्त्याबाबत मिळकतधारकांशी आयुक्तांनी चर्चा केली. त्याचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाकडे पाठविला आहे. येथे दोन पूल बांधण्यात येत असून, त्यामध्ये बीआरटी मार्गही करण्यात येणार आहे.’’

हा नवीन मार्ग झाल्यानंतर नाशिक महामार्गावरून येणारी जड वाहने या रस्त्यावरून देहूरोड-कात्रज मार्गावर जाऊ शकतील. पाच किलोमीटर लांबीच्या बीआरटी मार्गामुळे निगडीहून थेट किवळेपर्यंत जाता येईल. एकप्रकारे शहरांतर्गत बीआरटीचा रिंगरोड तयार होईल.
- विजय भोजने, बीआरटी प्रवक्ते, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com