पुणे - दापोडीकर पाणी टंचाईने त्रस्त

रमेश मोरे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : दापोडीत कमी दाबाने होणारा अपुरा पाणी पुरवठा, पाणी सोडण्याच्या अनियमित वेळा यामुळे गेली काही महिन्यांपासुन दापोडीत अपुऱ्या व विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रासले आहेत.

जुनी सांगवी (पुणे) : दापोडीत कमी दाबाने होणारा अपुरा पाणी पुरवठा, पाणी सोडण्याच्या अनियमित वेळा यामुळे गेली काही महिन्यांपासुन दापोडीत अपुऱ्या व विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रासले आहेत.

पुरवठा विभागाकडून पाणी कमी दाबाने सोडले जाते. तर यातच भरीस भर म्हणुन पाणी सोडण्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत. सर्वसामान्यांची कामे यामुळे खोळंबली जात आहेत. कामधंद्याला जाण्याऐवेजी अनेकांना पाण्याच्या विवंचनेत राहावे लागत आहे. यातच पाणी कमी मिळत असल्याने येथील गुलाबनगर, नवभारत नगर या परिसरातील नागरीकांना इतर भागात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
येथील पवार वस्ती, नवभारत नगर, गुरव पट्टा, गुलाबनगर, दापोडी गावठाण या परिसरातील पाणीपुरवठा तीन महिन्यांपासून विस्कळीत झालेला आहे.

"लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी पडत आहे. पाण्यासाठी आजही ठोस उपाययोजनेच्या अभावामुळे दरवर्षी दापोडीकरांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाचा शेवटचा टप्पा दापोडी आहे. त्यामुळे आवश्यक तेवढा पाणी पुरवठा होत नाही. नविन मोठ्या व्यासाच्या पाईपलाईनचा प्रस्ताव आहे. पाठपुरावा सुरू आहे, असे नगरसेवक रोहित काटे यांनी सांगितले.  

"अनेक नागरीक नळाला मोटारी जोडुन पाणी चोरी करतात मात्र पाणी पुरवठा यंत्रणेकडुन अशा नागरीकांवर कारवाई केली जात नसल्याचे एका नागरीकाने सकाळशी बोलताना सांगितले."

महापालिका प्रशासन डिसेंबरपासून २४ तास पाणी देण्याची योजना राबविणार आहे, पण दापोडीत नागरिकांना सद्यस्थितीत एकवेळ सुद्धा सुरळीत पाणी मिळत नाही. बहुतांश महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याचा परिणाम घरातील कामांवर होत आहे.
 
"नळाला पाणी आल्यानंतर दोनतीन हंडे पाणी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. नळावर पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी होते. मिळेल तेवढे पाणी दोन दिवस काटकसरीने वापरावे लागते. महापालिकडून सर्वसामान्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात नाही. आमचे पाण्याविणा हाल होत आहे, असे अशोक कांबळे यांनी सांगितले. 
 
"नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.मात्र यातही दापोडीकरांच्या पाण्याचे राजकारण होत असल्याची शंका वाटते.दरवर्षी आम्हाला पाण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतो. माई काटे- नगरसेविका"
 पाण्याच्या अनियमित वेळा व कमी दाबाने येणारे पाणी यामुळे नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, असे संतोष जाधव यांनी सांगितले.

Web Title: citizens of dapodi in problem because lack of water