डांगे चौकातील पदपथ ‘गायब’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

पिंपरी - डांगे चौकात अतिक्रमणांमुळे पदपथच गायब झाला आहे. राजकीय वरदहस्तामुळे येथील फेरीवाल्यांपुढे महापालिकेचे अधिकारीही लोटांगण घालत आहेत. डांगे चौकात पदपथ दाखवावा, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी महापालिकेला केले आहे.

पिंपरी - डांगे चौकात अतिक्रमणांमुळे पदपथच गायब झाला आहे. राजकीय वरदहस्तामुळे येथील फेरीवाल्यांपुढे महापालिकेचे अधिकारीही लोटांगण घालत आहेत. डांगे चौकात पदपथ दाखवावा, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी महापालिकेला केले आहे.

डांगे चौकातील फेरीवाल्यांना आणि येथील आठवडे बाजाराला रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. त्यांनी वेळोवेळी अनेकदा महापालिकेकडे तक्रारीही केल्या. मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर महापालिकेने काही वेळा येथील आठवडे बाजारातील फेरीवाल्यांवर कारवाईचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे येथील फेरीवाल्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महापालिकेनेही आता येथील फेरीवाल्यांसमोर लोटांगण घातले आहे.

फेरीवाल्यांकडून स्थानिकांची वसुली
डांगे चौक परिसरात काही स्थानिक मंडळींनी पदपथ ताब्यात घेतले आहेत. एका एकाच्या सात-आठ हातगाड्या भाड्याने दिलेल्या असून, त्यातून हजारो रुपये त्यांना मिळत आहे. येथील दुकानदारांनाही दादागिरी करून त्यांच्या दुकानासमोर हातगाड्या लावल्या आहेत. मात्र, वसुली करणारे डांगे चौक परिसरात राहत नाहीत.

ग्राहकांना नाही तोटा
डांगे चौक परिसरात मजूरअड्डा आहे. याशिवाय आयटी क्षेत्रात काम करणारेही याच मार्गाने जातात. यामुळे या भागात ग्राहकांना तोटा नाही. दिवसभर या भागात वर्दळ असते. मात्र, सायंकाळी पाचनंतर फेरीवाल्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते.

कचऱ्याचा प्रश्‍न कायम
फेरीवाले दिवसभर धंदा करतात. मात्र, रात्री जाताना कचरा रस्त्यावरच टाकतात. आठवडे बाजारातही हाच प्रकार सुरू असतो. येथील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेला येथील फेरीवाल्यांकडून एकही पैशाचे उत्पन्न नसताना त्यांचे एवढे लाड का, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. 

‘‘डांगे चौक परिसर नेहमीच फेरीवाल्यांनी कब्जा केलेला असतो. मात्र, रविवारी तर कळस होतो. या दिवशी आम्ही सहकुटूंब फिरायला जाण्यासाठी चारचाकी वाहने बाहेर काढू शकत नाही. कुणी आजारी पडले तरीही रुग्णवाहिका येऊ शकत नाही. महापालिकेने काहीतरी तोडगा काढला पाहिजे.’’
- काळुराम पारखी, रहिवासी

‘‘फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई यापुढील काळात आणखी तीव्र केली जाईल. आठवडे बाजारासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. आठवडे बाजारानंतर येथील कचरा साफ करण्यात सोमवारी आमच्या आरोग्य विभागाचा बराचवेळ वाया जातो. आठवडे बाजारातील अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात येईल.’’
- संदीप खोत, ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी