देहूतील बाह्यवळण पूर्णत्वाकडे

संदीप भेगडे
गुरुवार, 8 जून 2017

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार बांधणी

देहूरोड - तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहूतील मुख्य मंदिराच्या पश्‍चिमेस इंद्रायणी नदीवरील पूल ते विठ्ठलवाडी व्हाया येलवाडी या १९ कोटी रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता असलेल्या पावणेतीन किलोमीटरच्या बाह्यवळण रस्त्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानापूर्वी रस्ता खुला करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. मार्गात ओढ्यावर सुमारे सव्वाशे मीटर लांब व १२ मीटर रुंदीच्या पुलाचाही समावेश आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहूच्या दक्षिणेकडील तळवडे ते अनगडशाहवलीबाबा दर्ग्याजवळून इंद्रायणी नदीवरील पुलापर्यंतचा रस्ता उभारणीचे काम कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीमार्फत सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इंद्रायणीवरील पुलापासून सुरू झालेला रस्ता देहू-आळंदी रस्त्याला विठ्ठलवाडीत मिळतो. पुढे येलवाडीपर्यंत नव्या बाह्यवळणची हद्द आहे. १८ मीटर जागेत रस्ता सात मीटर रुंद असून, दोन्ही बाजूंना अडीच मीटर रुंदीच्या साइड पट्ट्या व तीन मीटर रुंद गटारांचा समावेश आहे. तळवडेकडील बाजूस डांबरीकरणाचे तीन थर देऊन झाले आहेत. इंद्रायणी पूल ते दर्ग्याजवळील जुन्या पुलापर्यंत सध्या बीबीएममधील डांबरीकरण केले आहे. उर्वरित डांबरीकरण पावसाळ्यानंतर करणार आहे. दरम्यान, विठ्ठलवाडी ते येलवाडीदरम्यान विठ्ठलवाडी दिशेच्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पुढे हा मार्ग देहू-आळंदी मार्गाला जोडणे बाकी आहे.

महापालिकेशी वाटाघाटी 
बाह्यवळणमार्ग विठ्ठलवाडी येथे जोडणे बाकी आहे. या शिवेच्या रस्त्याचे खरेदीखत पिंपरी-चिंचवड महापालिका करून देणार असून, वाटाघाटी सुरू आहेत. आठवड्यात प्रक्रिया पूर्ण होऊन जागा ताब्यात मिळेल. त्यानंतर हा रस्ता देहू-आळंदी रस्त्याला जोडून त्याचे तीर्थक्षेत्र निधीतून डांबरीकरण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग हवेलीचे शाखा अभियंता सचिन टिळक यांनी सांगितले.

दोन्ही बाह्यवळण मार्ग देहूचे दळणवळण सोईस्कर होण्याच्या दृष्टीने वरदान ठरणार आहेत. मार्गात ठिकठिकाणी राहिलेली कामे जलदगतीने पूर्ण करावीत.
- हेमलता काळोखे, पंचायत समिती सदस्या, देहू