दौंड: सलग दुसऱ्या दिवशी डीएमयूला साडेतीन तासांच्या विलंब 

daund train issue
daund train issue

दौंड : गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने विलंबाने जाणाऱ्या बारामती-दौंड-पुणे डिझेल मल्टिपल यूनिट (डीएमयू) शुक्रवारी दोन तासांच्या विलंब झाला तर आज सलग दुसऱ्या दिवशी साडेतीन तासांच्या विलंब झाला. प्रवासी आंदोलन करतील या भीतीने रेल्वे प्रशासनाने सिग्नल नसताना डीएमयू दौंड रेल्वे स्थानकाच्या बाहेर काढून ए कॅबिनजवळ उभी केल्याने प्रवासी ताटकळले. 

दौंड रेल्वे स्थानकावर आज (ता. ४) सकाळी दौंड - बारामती ( गाडी क्रमांक ७१४०१) डीएमयू ही आपल्या निर्धारित वेळेनुसार पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी रवाना होणे अपेक्षित असताना विलंबामुळे सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी बारामती कडे रवाना झाली. सदर डीएमयू बारामती येथे दाखल झाल्यानंतर तीच गाडी बारामती-दौंड-पुणे (गाडी क्रमांक ७१४०२) डीएमयू म्हणून सोडली जाते. बारामती येथून आज निर्धारित वेळेनुसार डीएमयू सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी रवाना होणे अपेक्षित होती विलंबामुळे ती ७ वाजून ४५ मिनिटांनी रवाना झाली. भरीस भर म्हणून विलंबाने धावणारी डीएमयू दौंड रेल्वे स्थानक येथे फलाट उपलब्ध नसल्याच्या कारणावरून ९ वाजून १० मिनिटांनी फलाटावर दाखल करून घेण्यात आली. दरम्यान वेळेवर धावणाऱ्या सोलापूर - दौंड - पुणे हुतात्मा एक्सप्रेस, कोईमतूर - मुंबई कुर्ला एक्सप्रेस आणि विलंबाने धावणारी वाराणसी - म्हैसूर (गाडी क्रमांक १६२३०) संपर्क क्रांती एक्सप्रेस देखील रवाना करण्यात आली. त्यानंतर ९ वाजून ४५ मिनिटांनी डीएमयू दौंड रेल्वे स्थानकाच्या बाहेर काढण्यात आली.  

रेल्वे प्रशासनाने डीएमयूचे प्रवासी काल (ता. ३) प्रमाणे गाडी दौंड रेल्वे स्थानकातच रोखून धरतील या भीतीने ९ वाजून ४५ मिनिटांनी दौंड रेल्वे स्थानकाच्या बाहेर काढून रेल्वे उड्डाण पुलाच्या अलिकडे 'ए' कॅबिन येथे उभी केली. पुणे रेल्वे विभागाने गाडी सोडण्यास परवानगी दिलेली नसताना डीएमयू उभी करून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सुपरफास्ट व एक्सप्रेस रवाना करण्यात आल्या. संतप्त प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढून प्रशासनाच्या या भेदभावाचा निषेध व्यक्त केल्याने त्यामुळे आणखी विलंब वाढला. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक सुरेंद्र कोश्ता, लोहमार्ग पोलिस दलाचे निरीक्षक देवसिंग बाविस्कर हे ए कॅबिनजवळ दाखल झाले. रेल्वेच्या कॅरेज अॅण्ड वर्क्स विभागाचे कर्मचारी यांनी रखडलेल्या डीएमयूचा साखळी ओढल्यामुळे झालेला बिघाड दुरूस्त केल्यानंतर दुपारी बारा वाजता ही डीएमयू पुण्याच्या दिशेने रवाना झाली. 
             
सोलापूर विभागीय व्यवस्थापक काऱ्यालयाकडून डीएमयू रखडवून ठेवत दौंड येथून सुपरफास्ट व एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्यतत्वावर रवाना करण्याचे स्पष्ट निर्देश असण्याबरोबर आज (ता. ४) पुणे विभागीय व्यवस्थापक काऱ्यालयाने दौंड - पुणे - दौंड दुहेरी लोहमार्गावरून धावणाऱ्या सुपरफास्ट व एक्सप्रेस गाड्यांना रवाना करण्यास प्राधान्य देत डीएमयू सोडण्यास नकार दिल्याने विलंब वाढत गेला. 

खा. सुप्रिया सुळे यांच्या ट्विट नंतर दिलगिरी...
खासदार सुप्रिया सुळे यांनी सदर विलंबाची माहिती मिळताच केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यासह सोलापूर व पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक यांचे बारामती - दौंड - पुणे डीएमयू ला दररोज होणाऱ्या विलंबाकडे ट्विटरद्वारे लक्ष वेधले. त्यानंतर दोन्ही विभागीय व्यवस्थापकांनी त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करीत या प्रकरणी संबंधितांना सूचित केल्याचे ट्वीटद्वारे कळविले. 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com