अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

निगडी - पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली. गोंधळाची परिस्थिती नियोजन नसल्याने निर्माण झाली होती. गैरसोय आणि ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांनी अर्ज दाखल करण्याचे काम काही वेळ बंद पाडले.

निगडी - पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली. गोंधळाची परिस्थिती नियोजन नसल्याने निर्माण झाली होती. गैरसोय आणि ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांनी अर्ज दाखल करण्याचे काम काही वेळ बंद पाडले.

पंतप्रधान आवास योजनेसाठी शहरात सात ठिकाणी अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत ३१ मे पर्यंत वाढवली असली तरी आज ‘फ’ प्रभाग कार्यालयावर नागरिकांची झुंबड उडाली. आवश्‍यक नसताना जास्त कागदपत्रांची मागणी केली जात आहे, याचा निषेध करत कष्टकरी संघर्ष महासंघाने ‘फ’ प्रभाग कार्यालयाचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी तणाव निर्माण झाला होता. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, इरफान चौधरी, संघटक अनिल बारवकर, चंद्रकांत कुंभार, राजेश कदम, प्रकाश साळवे, यासीन शेख आदींनी आक्रमक भूमिका घेतली होती. सरकारच्या योजनेत ठराविक कागदपत्रे बंधनकारक आहेत. केवळ आधारकार्ड, बॅंक कागदपत्रे आवश्‍यक आहेत. मात्र, वीजबिल, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, उत्पन्नाचा तहसील दाखला, फॅमिली फोटो इत्यादी कागदपत्रे मागितली जात आहेत. ‘अ’ प्रभागात आठ रुपयांची फाइल ३० रुपयांना विकली जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांचा नंबर लागत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. 

अर्ज स्वीकृतीत गोंधळ
महापालिकेकडून पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र, यात अनेक चुका असून आवश्‍यकता नसताना जास्त कागदपत्रांची जबरदस्तीने मागणी केली जात आहे, असा आरोप कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केला आहे. नखाते यांनी निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या योजनेत ठराविक कागदपत्रे नमूद आहेत. केवळ आधार कार्ड, बॅंक कागदपत्रे पुरेसे आहेत. मात्र महापालिकेकडून वीजबिल, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, बॅंक स्टेटमेंट, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे मागितली जात आहेत. ही सर्व कागदपत्रे एका फाइलमध्ये टाकून द्या, तरच घेतो, अशा अटी घातल्या जात आहेत. 

पिंपरीतही मोठ्या रांगा
पिंपरी - पंतप्रधान आवास योजनेच्या ‘सर्वांसाठी घर’ या योजनेतून बेघर नागरिकांना घर देण्यात येणार आहे. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी भर उन्हात मंगळवारी (ता.१६) नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

पंतप्रधान आवास योजनेतून ‘सर्वांसाठी घर’ हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार आहे. या योजनेतील लाभार्थी निश्‍चित करण्यासाठी महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत. १६ मे अंतिम मुदत घोषित केली होती. त्यानंतर, सोमवारी (ता. १५) उशिरा या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, याबाबतची माहिती नागरिकांना न मिळाल्याने मंगळवार अखेरचा दिवस असल्याचे नागरिकांना वाटले. यामुळे नागरिकांनी सकाळी सहापासून अर्ज भरण्यासाठी रांगा लावल्या. 

कर्मचाऱ्यांची मनमानी
रोज किती अर्ज घ्यायचे याबाबत महापालिकेने सांगितले नव्हते. मात्र, ‘ब’ प्रभाग आणि झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात कर्मचाऱ्यांनी २५० टोकन अर्ज घेण्यासाठी रांगेतील नागरिकांना दिले. मात्र, त्यानंतरही उन्हामध्ये नागरिक रांग लावून उभे होते. कार्यालयीन वेळेत काम झाल्यास पुढील नागरिकांचे अर्ज घेऊ, असे कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत होते. काही नागरिकांनी कामावर सुटी घेऊन सर्व कागदपत्र जमा करून रांग लावली होती. मात्र, तुम्ही उशिरा आलात त्यामुळे उद्या या, असे काही कर्मचारी त्यांना सांगत होते.

मुदतवाढीबाबत अनभिज्ञता
अर्ज भरण्यासाठी महापालिकेने ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय व झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत माहितीच नव्हती. अखेर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना फोन केल्यानंतर मुदतवाढीची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी याबाबतचा फलक लावला.