गणेशोत्सवात पीएमपीची वर्तुळाकार मार्गावर सेवा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे शहरातील वर्तुळाकार मार्ग ः स्वारगेट - डेक्कन - मनपा - शिवाजीनगर - पुणे स्टेशन - पूलगेट- स्वारगेट 
पिंपरी चिंचवडमधील वर्तुळाकार मार्ग ः भोसरी - नेहरूनगर - पिंपरी - चिंचवड - निगडी - पिंपरी रोड - नेहरूनगर - भोसरी 
(सायंकाळी सहा ते पहाटे दोन दरम्यान बससेवा - तिकीट दहा रुपये सरसकट - दर 10 मिनिटांनी बससेवा) 

पुणे - गणेशोत्सवादरम्यान पीएमपी प्रशासनाने शहराच्या मध्य भागातून, तसेच पिंपरी चिंचवडमध्येही वर्तुळाकार मार्गाची आखणी केली असून, शुक्रवारपासून (ता. 25) प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या मार्गावर दर दहा मिनिटांनी प्रवाशांना बससेवा उपलब्ध होणार असून, तिकीट दरही फक्त दहा रुपये असेल. तसेच, उत्सवादरम्यान रात्र बससेवा सुरू होणार असून शहर आणि पिंपरी- चिंचवडसाठी तब्बल 694 जादा बस पीएमपीने उपलब्ध केल्या आहेत. 

गणेशोत्सवादरम्यान रात्री दहानंतर पहाटे दोन वाजेपर्यंत किंवा गर्दी असेल तोपर्यंत पीएमपीकडून जादा बस पुरविल्या जाणार आहेत. या रात्र बससेवेसाठी नेहमीच्या दरापेक्षा पाच रुपये अधिक तिकीट असेल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. गणेशोत्सवादरम्यान सायंकाळपासून बंद होणाऱ्या रस्त्यांवर पर्यायी मार्गांनी बस वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. रात्र बससेवेसाठी मध्यरात्री 12 नंतर कोणत्याही प्रकारचे पास चालणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. उत्सवादरम्यान स्वारगेट, पुणे महापालिका बसस्थानक, पुणे स्टेशन, हडपसर गाडीतळ, महात्मा गांधी स्थानक, डेक्कन जिमखाना आणि संभाजी पूल कॉर्नर, निगडी बसस्थानक, भोसरी बसस्थानक, चिंचवडगाव बसस्थानक येथून गणेश विसर्जनापर्यंत विशेष बससेवा असेल. जादा बसपैकी सुमारे 250 बस पिंपरी- चिंचवडसाठी आहेत. 

या उत्सवाच्या अनुषंगाने प्रवाशांच्या सोयीसाठी 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान स्वारगेट ते निगडी या मार्गावर विशेष बससेवेअंतर्गत जादा बस सोडण्यात येणार आहेत. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावरील वाहतूक बंद झाली, तरी पर्यायी रस्त्यांनी या मार्गांवरील वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.