मेट्रो मार्गात अर्धा किलोमीटरने वाढ 

मेट्रो मार्गात अर्धा किलोमीटरने वाढ 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मेट्रोची लांबी सहाशे मीटरनी वाढविण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. त्यामुळे संत मदर तेरेसा पुलापर्यंत मेट्रोचा मार्ग वाढणार आहे. त्या दृष्टीने एम्पायर इस्टेट बसथांब्याजवळ कामही सुरू केले आहे. बीआरटी मार्गालगत मेट्रोचे काम होणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरवासीयांना या दोन्ही सेवा उपलब्ध होतील. 

महापालिका भवनानंतर मोरवाडीतील चौकात मेट्रोचे शेवटचे स्थानक असेल. तेथून पुढे 540 मीटरपर्यंत मेट्रो वळविण्यासाठीचा ट्रॅक बांधण्याचे नियोजन होते. मेट्रो गाडीची तपासणी, देखभाल दुरुस्ती, अन्य मार्गांवर वळविण्याची सुविधा या उद्देशाने मेट्रोचा मार्ग स्थानकापासून पुढे 1 हजार 154 मीटरपर्यंत वाढविण्याचा निर्णय महामेट्रोने नुकताच घेतला. पुलाच्या पलीकडे एक खांब घेण्यात येणार आहे. 

पुण्याकडून द्रुतगती मार्गाच्या दुभाजकावरून येणारा मेट्रो मार्ग खराळवाडीनंतर सेवा रस्त्याकडे वळविण्यात येत आहे. पूर्वी तो बीआरटी मार्गातून होता. त्यासाठी दोन खांबांच्या पाया भरणीचे काम झाले. मात्र, महापालिकेने त्याला हरकत घेतली. बीआरटी मार्ग सुरक्षित ठेवून, त्याच्या कठड्यालगत सेवा मार्गावरून मेट्रोचे खांब उभारण्याचे ठरले. त्यानुसार खराळवाडी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान सात ठिकाणी पाया खोदण्याचे काम गेल्या पंधरवड्यात सुरू झाले. 

मुख्य मार्गावरून सेवा रस्त्याकडे वळताना दीड मीटरपेक्षा जास्त अंतर असल्याने पहिल्या दोन ठिकाणी प्रत्येकी दोन खांब उभारून त्यावर व्हाया डक्‍ट (पूल) बांधण्यात येईल. तसेच चौकातही एका ठिकाणी लगत बांधलेल्या दोन खांबांवर व्हाया डक्‍ट बांधण्यात येणार आहे. 

निगडीपर्यंतचा डीपीआर 15 ऑगस्टला 
मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची शहरावासीयांची मागणी लक्षात घेऊन महापालिकेने त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) करण्यासाठी निधी दिला. महापालिका भवन ते निगडी या साडेचार किलोमीटर अंतराचा डीपीआर महामेट्रो 15 ऑगस्टपर्यंत महापालिकेला व राज्य सरकारला सादर करणार आहे. त्या कामासाठी एक हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. चिंचवड, आकुर्डी व निगडी ही तीन स्थानके असतील. नाशिक फाटा ते चाकण या 19.5 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचा आराखडा सप्टेंबरअखेरीला पूर्ण होईल. स्वारगेट ते कात्रज मार्गाचा डीपीआर 15 सप्टेंबरपर्यंत पुणे महापालिकेला सादर करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. 

आकडे बोलतात ........... 
पालिकेच्या हद्दीत मेट्रोचे खांब 281 
घेतलेले फाउंडेशन 164 
खांब पूर्ण 125 
पीलर कॅप 55 
व्हायाडक्‍टचे स्पॅन 16 
व्हायाडक्‍टसाठीचे सेगमेंट तयार 768 

पिंपरी-चिंचवडमध्ये वेगाने काम सुरू असून, येत्या महिन्याभरात व्हाया डक्‍ट उभारणीसाठी आणखी एक गर्डर लॉंचर दापोडी येथे बसविण्यात येईल. स्थानकांचे कामही गतीने सुरू आहे. संरक्षण दलाची मान्यता मिळाल्यानंतर रेंज हील्स भागातील खांब उभारणीला प्रारंभ करू. नाशिकफाटा पुलाजवळील तीस खांब उभारणीसाठी प्राथमिक कामे हाती घेतली आहेत. 
- गौतम बिऱ्हाडे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com