‘एचए’ जमीन लिलाव प्रक्रिया सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍सची थकीत देणी देणे आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात परवानगी दिली आहे. अनेक दिवसांपासून थकीत असणारे कामगारांचे वेतन देण्यासाठी केंद्र सरकारने १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले असले, तरी लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रक्‍कम केंद्र सरकार परत घेईल. 
- श्रीरंग बारणे, खासदार.  

पिंपरी - हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स लिमिटेड या कंपनीच्या सुमारे ८७.७० एकर अतिरिक्‍त जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही जमीन फक्‍त सरकारी उपक्रमांनाच देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने ही जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एमएसटीसी लिमिटेड या सरकारी कंपनीची नियुक्‍ती केली आहे. येत्या ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. कंपनीला या जमिनीच्या विक्रीमधून एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम मिळणार आहे. 

केंद्र सरकारने २१ डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍सचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कंपनीकडे असणाऱ्या अतिरिक्‍त जमिनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या कंपनीला ८२१ कोटी रुपयांची देणी आहेत, ती पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून थकीत असणारे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी केंद्र सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

कंपनीच्या या जमीन लिलाव प्रक्रियेत प्रामुख्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध उपक्रमांना सहभागी होता येणार आहे.

 हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍सकडे ८७.७० एकर अतिरिक्‍त जमीन.
 नेहरूनगर आणि अन्य ठिकाणी ६२.७० एकर जमीन रिकामी, २५ एकर जमीन हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स कॉलनीत.
 विविध आकारमानाचे एकूण १७ भूखंड.
 जमिनीचे क्षेत्र तीन लाख ५४ हजार ९०६ चौरस मीटर. 
 लिलावाची प्रक्रिया पाच महिने १५ दिवस चालणार असून, त्यापैकी ९० दिवसांचा अवधी हा जमीन घेणाऱ्यांना रक्‍कम भरण्यासाठी देण्यात येणार आहे.