... आता पुढचं आयुष्य फक्त देशासाठीच!

स्वप्नील जोगी
सोमवार, 29 मे 2017

माझे आजोबा आणि वडीलदेखील लष्करात होते. मी आजोबांनाच ही पदवी समर्पित करतोय. देशासाठी जे हवं ते करायला मी तयार असेन. नाहीतर गेली तीन वर्षं जी कठोर मेहनत घेतलीय आम्ही सगळ्यांनी; ती वाया गेल्याचंच म्हणावं लागेल !

पुणे: 'वयाच्या बाराव्या वर्षी मी मिलिटरी स्कूल प्रवेश घेतला. मला आठवतं तेव्हापासून मला फक्त लष्करातच यायचं होतं. देशाची सेवा करायची होती. त्यामुळे पुढेही मी फक्त एनडीएसाठीच अर्ज केला होता, दुसरं कुठलं करिअर नव्हतंच मनात... डोक्यात होता तो फक्त एकच ध्यास- एनडीए आणि एनडीएच! आता पुढचं आयुष्य फक्त देशासाठीच असणार आहे माझं...'- सांगत होता देवेंद्र कुमार.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 132 व्या तुकडीच्या पदवीदान सोहळ्यात विशेष सन्मानाने गौरविण्यात आलेल्या स्नातकांपैकी एक असणारा हरियाणाचा कॅडेट देवेंद्र भारावून बोलत होता. खरंतर, तिथे उपस्थित असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचं तो प्रतिनिधित्व करत असल्याचं जाणवून आलं.

देवेंद्र म्हणाला, ''माझे आजोबा आणि वडीलदेखील लष्करात होते. मी आजोबांनाच ही पदवी समर्पित करतोय. देशासाठी जे हवं ते करायला मी तयार असेन. नाहीतर गेली तीन वर्षं जी कठोर मेहनत घेतलीय आम्ही सगळ्यांनी; ती वाया गेल्याचंच म्हणावं लागेल !'

आकाश एआर म्हणाला, ''माझं सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवण्याचं प्रमुख श्रेय मी माझ्या एनडीएला देईन. या संस्थेनं मला जगण्याची मूल्ये शिकवली. पुढे मला फायटर पायलट बनायचंय.'

अवखळ मुलगा ते जबाबदार व्यक्ती !
आदित्य निखरा म्हणाला, ''ज्या दिवसाची आम्ही सर्वजण गेली तीन वर्षं वाट पाहत आलो, तो दिवस आज आला. या तीन वर्षांत मी अंतर्बाह्य बदललोय. कितीतरी प्रकारचे साहसी खेळ मी आता खेळू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मनाने खूप जास्त कणखर झालोय. एक अवखळ मुलगा ते एक जबाबदार व्यक्ती असं काहीसं स्थित्यंतर मी आज अनुभवतोय...'

त्यांना पुढे जाण्यासाठी बळ द्या...
प्रबोधिनीचे कमांडन्ट एयर मार्शल जसजीत सिंग क्लेर यांनी या वेळी पहिल्यांदाच पालकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''देशाचे सार्वभौमत्व टिकवणे केवळ जवानांचे कार्य नाही. हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. पालकांनो, तुमची मुले उद्या उभ्या देशाची मान उंचावणार आहेत. या संस्थेने त्यांच्यात घडवलेलं स्थित्यंतर हेच उद्या देशाची शान उंचावण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे. सियाचीनच्या ग्लेशियर वर जाऊन आपल्या देशाचं रक्षण करण्याचं धैर्य आज त्यांच्या बाहूंत भरलं गेलं आहे. त्यांना पुढे जाण्यासाठी बळ द्या...'