‘बेटी बचाओ’ला  डॉक्‍टरांची साथ!

‘बेटी बचाओ’ला  डॉक्‍टरांची साथ!

बेटी बचाओ, बेटी पढाओ
भोसरी येथील लेखा हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्मल्यास नैसर्गिक प्रसूती आणि रुग्णालयाचे बिल पूर्ण माफ करण्याची अभिनव योजना तीन महिन्यांपासून सुरू केली आहे. त्यात सिझेरियन झाल्यास ५० टक्के बिल आकारले जात असल्याचेही लेखा हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय साळवे आणि डॉ. पूजा साळवे यांनी सांगितले. 

कन्यारत्नाचे स्वागत करूयात
मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती, गुणवान मुलगी ही तर देशाची संपत्ती असा संदेश कडा येथील (ता. आष्टी, जी. बीड) टेकाडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने दिला आहे. मुलगी झाल्यास नॉर्मल प्रसूती मोफत तर, सिझरच्या बिलामध्ये ५० टक्के सवलत दिली जाईल, अशी माहिती डॉ. मंजुश्री टेकाडे यांनी दिली. 

आई-वडिलांनाही सवलतीत उपचार
माळवाडी, हडपसर येथील सुप्रिया क्‍लिनिकमध्ये जन्मलेली मुलगी आणि तिच्या आई-वडिलांना होमिओपॅथी उपचाराच्या तपासणी फीमध्ये एक वर्षापर्यंत ५० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे डॉ. सुप्रिया मोरे-दुगड आणि डॉ. रितेश दुगड यांनी कळविले आहे.

मिठाई वाटून मुलीच्या जन्माचे स्वागत
केशवनगर, मुंढवा भागात गेल्या बारा वर्षांपासून रुग्णसेवा करणाऱ्या ओम हॉस्पिटल मिठाई वाटून मुलीच्या जन्माचे स्वागत केले जाते, अशी माहिती डॉ. हरीश साळुंखे यांनी कळविली आहे. नैसर्गिक प्रसूती होऊन मुलीचा जन्म झाल्यास कोणतेही फी आकारली जात नाही. तसेच, सिझेरियन करावे लागल्यास आलेल्या बिलात ५० टक्के सूट दिली जाते. 

मुलींची मोफत तपासणी
उपचाराची सगळी गणिते आर्थिक परिस्थितीशी येऊन थांबतात. मुलगी असल्यास नक्कीच तसे होते. त्यामुळे ‘बेटी बचाओ’ अंतर्गत फुरसुंगी येथील पापडे वस्तीतील सानप हॉस्पिटलमध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलींच्या तपासण्याची फी आकारली जात नाही. स्त्री जन्माचे स्वागत करणे, हा त्यामागील उद्देश आहे, असे डॉ. विवेकानंद सानप यांनी सांगितले. 

मोफत तपासणी व सल्ला
उरुळी देवाची येथील श्रीपाद हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या मुलीला व तिच्या आई-वडिलांना एक वर्षापर्यंत मोफत सल्ला व मोफत तपासणी करण्यात येत आहे. डॉ. गणेश सातव व डॉ. सारिका सातव अशा प्रकारे या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. डॉ. सारिका सातव या मगरपट्टा सिटी येथील नोबल रुग्णालयात ‘डाएट व न्यूट्रिशन’ विभाग प्रमुख आहेत. तेथेही वर्षभर मोफत सल्ला दिला जातो.

आनंदाने स्त्रीजन्माचे स्वागत व्हावे
स्त्री जन्माचे उपेक्षेने नव्हे तर आनंदाने व्हावे, यासाठी सामाजिक मानसिकता बदलावी लागणार आहे. त्यामुळे डॉ. राख यांच्या अभियानास प्रतिसाद म्हणून रामटेकडी येथील इंदिरा क्‍लिनिकमध्ये मुलीच्या आणि तिच्या आई-वडिलांच्या फीमध्ये एक वर्षांपर्यंत १०० टक्के सवलत दिली जाते, असे डॉ. चेतन चव्हाण यांनी सांगितले. 

तीन वर्षे मोफत तपासणी
आळंदी येथील ज्ञानेश्‍वरी क्‍लिनिकमध्ये मुलीची तीन वर्षांपर्यंत मोफत तपासणी करण्यात येणार आहे, असे डॉ. हर्षल म्हस्के पाटील यांनी कळविले आहे. या उपक्रमाची सुरवात डॉ. राख यांच्या हस्ते झाली.

नवरात्रीनिमित्त ‘बेटी बचाओ’ची सुरवात
नवरात्रीच्या पवित्र कालावधीमध्ये ‘बेटी बाचओ’ आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कामशेत येथील कमल हॉस्पिटलमध्ये नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत प्रसूतीनंतर मुलगी झाल्यास ५० टक्के बिल कमी करण्यात येणार आहे, असे डॉ. नितीन सूर्यवंशी आणि डॉ. ऊर्मिला सूर्यवंशी यांनी कळविले आहे. 

‘बेटी बचाओ’ कार्यशाळा
सुरत येथे २००९ मध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेत मुलांच्या तुलनेत मुलींची वेगाने कमी होणाऱ्या प्रश्‍नाकडे लक्ष्य वेधले. त्यानंतर बारामतीमध्ये या बाबत जनजागृती करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यासाठी बेटी बचाओ बद्दल कार्यशाळा घेण्यात येतात. समाजात मुलींच्या जन्माचे स्वागत होण्यासाठी लैंगिक समानता येणे महत्त्वाचे आहे, असा विश्‍वास बारामती येथील स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. राजेश कोकरे यांनी व्यक्त केला. पथनाट्य स्पर्धा, कार्यशाळा यातून बेटी बचाओचे स्वागत करण्यात येत आहे.

मुलगी झाली म्हणून ...
‘मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती, गुणवान मुलगी ही तर देशाची संपत्ती,’ या विचारातून भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील खानावरे हॉस्पिटलमध्ये बेटी बचाओ अभियान सुरू झाले आहे. नैसर्गिक प्रसूती आणि सिझरच्या बिलामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे डॉ. अमोल खानावरे यांनी सांगितले. तसेच, जन्मलेल्या मुलीचे दंतविषयक सल्ला व तपासणी तीन वर्षांपर्यंत मोफत दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

‘बेटी बचाओ’मध्ये सहभागी व्हा
बेटी बचाओ आंदोलनात सहभागी व्हा, असा संदेश देत पुण्यातील महावीर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलने मुलीला पाच वर्षांपर्यंत मोफत तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले. ५ ते १० वर्षांपर्यंतच्या तपासणी फीमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार असून, मुलीच्या आई-वडिलांना एक वर्षापर्यंत तपासणी फीमध्ये ५० टक्के सवलत असल्याचे डॉ. विमल परमार यांनी कळविले आहे. 

बिलात ५० टक्के सवलत
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे असलेल्या आदिशक्ती हॉस्पिटलमध्ये मुलगी वाचवा अभियान सुरू आहे. मुलीचा जन्म झाल्यास बिलामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येते. नॉर्मल आणि सिझेरियन या दोन्हीसाठी ही योजना असल्याची माहिती डॉ. अपर्णा शिंदे आणि डॉ. अभिजित शिंदे यांनी दिली.मुलीच्या सर्व प्रकारच्या लसीकरणातही २५ टक्के सवलत देण्यात येते. 

इंदापूर तालुक्‍यात मुलगी वाचवा अभियान
डॉ. गणेश राख यांनी सुरू केलेल्या ‘मुलगी वाचवा’ अभियानात इंदापूर तालुक्‍यातील डॉक्‍टर सहभागी झाले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था आणि कार्पोरेट हॉस्पिटल्स या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत, असे इंदापूर तालुक्‍यातील शहाजीनगर (भोडणी) येथील शतायू क्‍लिनिकच्या डॉ. संतोष खाडे आणि डॉ. वैशाली खाडे यांनी कळविले आहे. डॉ. रघुनंदन व सविता पोमणे, डॉ. गणपत बनकर, डॉ. संग्राम मगर, डॉ. मनोज ढोले, डॉ. अमर गायकवाड, डॉ. ज्योतिराम व पूनम देसाई, डॉ. महेश घोळवे हे मुलीच्या जन्माच्या स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर एक वर्षांपर्यंत ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार करण्याचे धोरण स्वीकारले आहे. तसेच, सौरभ मेडकल्स, त्रिमूर्ती मेडिकल्स, देसाई मेडिकल्स, माउली मेडिकल्स, यमाई मेडिकल्स, कीर्ती मेडिकल्स या औषध दुकानांमधूनही एक वर्षापर्यंतच्या मुलींच्या औषधांवर १० टक्के सवलत देण्यात येत आहेत. तर, निदान पॅथॉलॉजी लॅब, देसाई पॅथलॅबमध्ये तीन वर्षांपर्यंतच्या मुलींच्या रक्त तपासणीत ३० टक्के सवलत जाहीर केली आहे. 

उत्तर महाराष्ट्रात होतेय जनजागृती
सिन्नर (जि. नाशिक) येथील डॉ. लोहार मेडिकेअर क्‍लिनिक येथे मुलीच्या जन्मानंतर मुलगी आणि तिच्या आई-वडिलांना दोन वर्षे मोफत तपासणी सुरू केली आहे, असे डॉ. प्रमोद लोहार यांनी सांगितले आहे. डॉ. शरद सांगळे हेही ‘बेटी बचाओ’ आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या सांगळे हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्मल्यास बिलावर ५० टक्के सवलत दिली जाते. डॉ. सागर शिरसाट, डॉ. विक्रम पानसरे, डॉ. दिनेश कदम, डॉ. प्रवीण पवार हे वैद्यकीय तज्ज्ञदेखील यात सहभागी होत आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात मुलीच्या जन्माचे स्वागत होईल, असा विश्‍वासही व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com