दापोडी-निगडी समस्यांच्या गर्तेत

दापोडी-निगडी समस्यांच्या गर्तेत

पिंपरी : निगडीच्या चौकात सुरू असणारी विकासकामे, सर्व्हिस रोडवर असणारी अतिक्रमणे, मेट्रोचे काम अशा समस्यांच्या गर्तेत पुणे-मुंबई महामार्ग दापोडी ते निगडीदरम्यान अडकला आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. 

पुणे-मुंबई महामार्गाचा वापर प्रामुख्याने लोणावळा, तळेगाव, कामशेत या ठिकाणी नोकरी, व्यवसायानिमित्त जाणारी मंडळी करीत आहेत. महामार्गावर निगडीमधील भक्‍ती-शक्‍ती चौकात उड्डाण पूल आणि ग्रेडसेपरेटचे काम सुरू आहे. या ठिकाणी योग्य प्रकारे वाहतूक नियोजन करण्यात आले नसल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. 

देहूरोडकडून निगडीकडे येताना रस्त्याच्या बाजूला थांबणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. 

निगडीमधील टिळक चौकात रस्त्याच्या बाजूला थांबणाऱ्या रिक्षा, बस व दुचाकी वाहने यामुळे परिसरातील वाहतुकीच्या समस्या अधिक गंभीर आहे. 

निगडी ते चिंचवडदरम्यानच्या प्रवासापेक्षा पिंपरी ते दापोडीपर्यंतच्या प्रवासात अधिक त्रास सहन करावा लागतो. 

पिंपरी-दापोडीदरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात सकाळी व सायंकाळी वाहनांचा मोठ्या रांगा लागतात. मेट्रोच्या कामासाठी कासारवाडी ते खराळवाडीदरम्यानचा ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद असतो. त्यामुळे वाहनचालकांना सेवा रस्त्याचा वापर करावा लागतो. कासारवाडी परिसरातील सेवा रस्त्यावर रिक्षा स्टॅंड, टुरिस्ट बस थांबत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. दापोडीजवळील सीएमई चौक, फुगेवाडी या दोन ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागतात. कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. 

दृष्टिक्षेपात महामार्ग 
- जुना पुणे-मुंबई महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो 
- रस्ते विकास महामंडळाकडे हा रस्ता 2030 पर्यंत राहणार 
- निगडी ते देहूरोडदरम्यान रस्तारुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर 
- वडगाव येथे सेवा रस्त्याचे (सर्व्हिस रोड) काम प्रस्तावित 
- कामशेतमध्ये भुयारी मार्गाचे (व्हेईकल अंडरपास) काम 
- बोरघाट ते खोपोली आणि खोपोली ते खालापूरदरम्यान रुंदीकरण 
- कोन परिसरात दोन उड्डाण पूल प्रस्तावित 
- पनवेल परिसरातील काळुंब्रे आणि गाडी नदीवर नवीन पूल प्रस्तावित 

काय करायला हवे 
- वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी फिरत्या पथकाची स्थापना करावी 
- वाहतूक कोंडीला कारणीभूत बसथांबे तात्पुरत्या स्वरूपात हलवावेत 
- संपूर्ण मार्गावरील सिग्नल यंत्रणेचा अभ्यास करून वेळ निश्‍चित करावी 
- दापोडी ते निगडीदरम्यान रस्त्याच्या कडेला पार्किंगला शिस्त लावावी 
- मार्गावरील प्रमुख चौकांमधील अतिक्रमण काढावीत 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com