प्रवाशांच्या तक्रारींची 24 तासांत दखल; पीएमपी व्यवस्थापनाचा दावा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

पुणे : बसगाड्यांची दुरवस्था, वेळापत्रकानुसार बसगाड्या उपलब्ध नसणे, थांब्यावर बस न थांबविणे, चालक-वाहकांचे गैरवर्तन, बसगाड्यांची संख्या वाढविणे अशा स्वरूपाच्या सरासरी शंभर तक्रारी दररोज पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) प्रवाशांनी केल्याचे 'पीएमपी'कडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या सर्व तक्रारींची 24 तासांत दखल घेऊन त्या सोडविल्या जात असून, त्याचा परिणाम 'पीएमपी'ची सेवा सुधारण्यास होत असल्याचा दावा 'पीएमपी' व्यवस्थापनाने शनिवारी केला. 

प्रवाशांच्या तक्रारींसाठी 'पीएमपी'ने मोबाईल ऍपसह दूरध्वनी व मोबाईल क्रमांक आणि सोशल मीडियाचा वापर केला आहे. त्यातील 'पीएमपी ई कनेक्‍ट' (PMP E CONNECT) या ऍपच्या माध्यमातून 24 तासांत तक्रारींची दखल घेतली जाते; तसेच तक्रारींवरील कार्यवाही व त्याच्या स्वरूपाची माहितीही प्रवाशांना 'एसएमएस'द्वारे दिली जाते. 1 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत 'पीएमपी'कडे 3 हजार 301 जणांनी तक्रारी केल्या. त्यात सर्वाधिक 446 तक्रारी बसगाड्यांच्या दुरवस्थेबाबत असून, त्यापाठोपाठ 319 प्रवाशांनी बसमध्ये प्रथमोपचार पेटी नसल्याकडे लक्ष वेधले आहे. बसमध्ये पुरेसे प्रवासी नसतानाही त्या थांब्यांवर थांबविल्या जात नसल्याची 280 जणांनी तक्रार केली आहे. 

वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारी आगारप्रमुखांसह 26 अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन पद्धतीने पाठविल्या जातात. त्यांची 24 तासांत दखल घेणे बंधनकारक आहे. तक्रारीच्या स्वरूपानुसार तीन, पाच आणि सात दिवसांमध्ये कार्यवाही अपेक्षित आहे. त्याची माहिती तक्रारदाराला दिली जाते; तसेच त्यावरील त्यांचे मत जाणून घेतले जाते. तक्रारदारांनी समाधान व्यक्त केल्यास तक्रार संपुष्टात येते; अन्यथा ती पुन्हा अधिकाऱ्यांकडे दिली जाते. 

या संदर्भात पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे म्हणाले, ''प्रवाशांच्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेण्यात येते. त्यामुळे तक्रारींचे प्रमाणही वाढत असून, त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांना कालावधी ठरवून दिला आहे. दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.'' 

तक्रारींचे स्वरूप संख्या 

  • बसची स्थिती : 446 
  • प्रथमोपचार पेटी नसणे : 319 
  • वेळेत बस न येणे : 280 
  • थांब्यांवर बस न थांबविणे :203 
  • पीएमपी सेवकांचे उद्धट वर्तन : 198 
  • बससंख्या वाढविणे : 157 
  • फलक नसणे : 123
Web Title: marathi news marathi website PMPML Pune Traffic