जोतिबा उद्यानाची दुरवस्था

रवींद्र जगधने
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पिंपरी - काळेवाडी येथील जोतिबा उद्यानात चालणारे क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉलचे सामने, प्रेमी युगुलांचे अश्‍लील चाळे, दुर्गुले व मद्यपींचा वावर आणि रोडरोमिओंचा हैदोस यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. 

पिंपरी - काळेवाडी येथील जोतिबा उद्यानात चालणारे क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉलचे सामने, प्रेमी युगुलांचे अश्‍लील चाळे, दुर्गुले व मद्यपींचा वावर आणि रोडरोमिओंचा हैदोस यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. 
याबाबत अनेकदा निर्दशनास आणूनही पोलिस व महापालिका प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे. अनेक वर्षांनंतर तयार केलेल्या काळेवाडीतील या एकमेव उद्यानाचा फायदा स्थानिक रहिवाशांना होतच नाही. उद्यानात चालणाऱ्या अश्‍लील चाळ्यांमुळे परिसरातील नागरिक आपल्या पाल्यांना उद्यानात पाठवत नाहीत. स्वच्छतागृहाची साफसफाई नसते, फरशा तुटल्या आहेत. झाडे मोडली आहेत. खेळणी तुटली आहे. दिवे-धबधबा बंद, खेळण्यांचा वापर मोठी मुलेच करत आहेत. त्यामुळे उद्यानाची दुरवस्था झाली आहे.

उद्यानात खेळाचे सामने
उद्यानात कोणत्याही प्रकारचे खेळ खेळण्यास बंदी असताना उद्यानात राजरोसपणे क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉलचे सामने भरतात. त्यासाठी शहराच्या विविध भागांतून तरुण येथे येतात. तसेच त्यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्यांना त्रास होतो. याबाबत खेळणाऱ्यांना कोणी सांगितल्यास त्याला मारहाण केली जाते.

रोडरोमिओंचा गोंधळ
उद्यानात सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना नसल्याने दिवस-रात्र उद्यानात रोडरोमिओंचा हैदोस असतो. उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्या महिला व तरुणींच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. उद्यानात व प्रवेशद्वारावर रोडरोमिओंचे टोळके थांबलेले असते. या उद्यानाला मात्र सुरक्षारक्षक नाही, तर महापालिका उद्यान विभागाचा एकही कर्मचारी येथे नसतो. 

प्रेमी युगुलांचे अश्‍लील चाळे 
उद्यानात जाण्यासाठी उद्यानाच्या पाठीमागून जागा आहे. त्यामुळे उद्यान बंद असतानाही प्रेमी युगुल उद्यानात प्रवेश करतात. सायंकाळी अंधार पडल्यानंतर उद्यानात त्यांचे अश्‍लील चाळे सुरू होतात. अनेकांनी दिव्यांची तोडफोड केली आहे. 

मद्यपान पार्ट्याही
उद्यानात मद्य व धूम्रपान पार्ट्या खुलेआम सुरू असतात. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या मुलांच्या बालमनावर विपरीत परिणाम होत आहे. या मद्यपींशी अनेकांची भांडणेही होतात.   

उद्यानाच्या या समस्येबाबत महापालिका प्रशासनाला अनेकदा सांगूनही दखल घेतली जात नाही. उद्यानाला ठेकेदारी पद्धतीने सुरक्षारक्षक नेमला आहे. मात्र तो जागेवर नसतो. महिला स्वच्छतागृह नाही. रोडरोमिओंचा त्रासाने नागरिक वैतागले आहेत.
- नीता पाडाळे, नगरसेविका

उद्यान एका संस्थेला चालविण्यासाठी दिले असून, सुरक्षा विभागामार्फत नेमलेल्या ठेकेदाराचे सुरक्षारक्षक पुरवले जातात. उद्यानात रोडरोमिओ येत असतील, काही मुले खेळत असतील त्याला काहीच करता येणार नाही. पोलिसांनाही याबाबत वारंवार सांगितले आहे. 
- सुरेश साळुंखे, उद्यान अधीक्षक, महापालिका

Web Title: marathi news pimpri news jotiba garden