मुंबई-पुणे वेगवान प्रवासासाठी "हायपरलूप' 

मुंबई-पुणे वेगवान प्रवासासाठी "हायपरलूप' 

शहरांतर्गत वाहतुकीबरोबरच दोन शहरांना जोडण्यासाठी उच्च क्षमतेने प्रवासी वाहतूक करणारी यंत्रणा (मास रॅपिड ट्रान्स्पोर्ट सिस्टिम) ही 21व्या शतकाची गरज आहे. ही गरज ओळखून पुणे-मुंबई प्रवास अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण करणारी "हायपरलूप' ही वाहतूक व्यवस्था विकसित करण्यात येत आहे. राज्य सरकारने हा प्रकल्प यशस्वी करण्याच्या दृष्टीने "व्हर्जिन हायपरलूप वन' कंपनीसोबत इरादा करार केला आहे. त्या निमित्ताने "पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'चे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांच्याशी योगिराज प्रभुणे यांनी साधलेला संवाद. 

प्रश्‍न - "हायपरलूप' हे तंत्रज्ञान काय आहे? 
- खासगी वाहनांबरोबरच बस, लोकल ट्रेन, बीआरटी, मेट्रो हे कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांच्या शहरांतर्गत वाहतुकीचे वेगवेगळे मार्ग आहे. अशा स्वरूपाची गरज दोन मोठ्या शहरांना जोडण्यासाठीही निर्माण होत आहे. मुंबई आणि पुणे ही त्यापैकीच प्रमुख शहरे आहेत. भूपृष्ठ वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी "एलॉन मस्क' यांनी प्रयोग केले आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी ही संकल्पना आणली. तीन हजार फुटांवरून उडणाऱ्या विमानाला हवेचा विरोध कमी असल्याने ते वेगाने जाते. ही स्थिती जमिनीवर आणायची म्हटल्यास त्यासाठी "ट्यूब' करावी लागेल. अशा 25 ते 30 मीटरच्या ट्यूबमधून प्रवाशांची वाहतूक करता येईल. मस्क यांनी 2016 मध्ये "हायपरलूप वन' नावाची कंपनी तयार झाली. हा व्हेंचर कॅपिटल फंड आहे. सर रिचर्ड ब्रॅनसन त्यांची "व्हर्जिन अटलांटिक' कंपनी, सुलतान अहमद बीन सुलायेम यांची "दुबई वर्ल्ड', कझाकस्तान येथील एक व्यापारी अशा सर्वांच्या भागीदारीतून "व्हर्जिन हायपरलूप वन' कंपनी तयार झाली आहे. दोन शहरांना जोडणारी "मास रॅपिड ट्रान्स्पोर्ट सिस्टिम', हवाई परिस्थितीची जमिनीवर निर्मिती आणि बुलेट ट्रेन या तीन संकल्पना एकत्र करून हायपरलूप तयार करण्यात आला आहे. 

प्रश्‍न - पुणे-मुंबई या मार्गाची निवड कशी केली? 
- हा प्रकल्प जगात कुठे राबविला जाऊ शकतो, याची प्राथमिक तपासणी 2017 मध्ये केली होती. त्यात बंगलोर-चेन्नई, मुंबई-पुणे, मुंबई-दिल्ली असे काही मार्ग होते. मुंबई-पुणे याची जवळीक असल्याने या मार्गाची निवड करण्यात आली. या प्रकल्पासाठी पुणे-मुंबई मार्ग योग्य आहे, याची तपासणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा विचार करावा, पूर्व व्यवहार्यता अहवालाच्या (प्री-फिझिबिलिटी रिपोर्ट) हा उद्देश होता. द्रुतगती मार्गावरून सुमारे साठ हजार कार दररोज पुण्याहून मुंबईला जातात. पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे अशा दोन्ही बाजूंनी जवळपास आठ हजार बस वाहतूक करतात. त्यांचे इंधन, त्यातून होणारे प्रदूषण, जाणारा वेळ खूप आहे. दोन शहरांमधील मोठ्या संख्येने प्रवाशांची वाहतूक करणारी कोणती व्यवस्था आहे, या दृष्टीने अभ्यास करून हा मार्ग निवडला. 

प्रश्‍न - या प्रकल्पाची पुढील वाटचाल कशी असेल? 
- पुण्यापासून नवी मुंबईपर्यंत हा हायपरलूप मार्ग असेल. नवी मुंबईपर्यंत नेमक्‍या कोणत्या मार्गाने हायपरलूप करायचे, त्याचा खर्च, त्याचा आराखडा, तांत्रिक बाबी, अर्थसाह्य, भौगोलिक रचना या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आता कंपनीतर्फे व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येणार आहे. येत्या ऑगस्टच्या दरम्यान कंपनी हा अहवाल सादर करणार आहे. त्याचा नेमका मार्ग, स्थापत्य अभियांत्रिकी, खर्च, वेगवेगळ्या परवानग्या याचा अभ्यास सहा महिन्यांमध्ये होईल. त्यानंतर "पीएमआरडीए', राज्य सरकार, केंद्र सरकार, आंतरराष्ट्रीय सुरक्षेचे निकष यासाठी पुढील तीन महिन्यांमध्ये काम पूर्ण होईल. त्यानंतर हा प्रकल्प करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. "डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट' हा त्यानंतरच्या टप्प्यावर होणार आहे. त्या पाठोपाठ खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com